Share

“शिवरायांनी सुरत लुटली, तो राग आजही काहींच्या मनात…”; जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात!

“साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी सुरत लुटली, त्याचा राग आजही काहींच्या मनात आहे,” असा घणाघात जयंत पाटील यांनी केला असून मुंबई तोडण्याच्या डावाबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Published On: 

Jayant Patil mumbai speech

🕒 1 min read

मुंबई – साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आजही वर्तमानातील राजकारणात कसा धुमश्चक्री घडवू शकतो, हे पाहायचं असेल तर शिवतीर्थावर यावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिवाजी पार्कवरील सभेत भाजपवर असा काही निशाणा साधला की, उपस्थित जनसागरही अवाक झाला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली, पण त्याचा वचपा काढण्यासाठी आजही काहींचा जीव जळतोय, हे विसरू नका,” असा खळबळजनक आरोप जयंतरावांनी केला आहे.

“मुंबई तोडण्याचा डाव ओळखा”

ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक सभेत बोलताना जयंत पाटील यांनी भाजपच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “सूरत लुटल्याचा राग आजही काहींच्या मनात धुमसत आहे. भाजप नेते अन्नामलाई (Annamalai) मुंबईत येऊन जे बोलून गेले, त्यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतोय. मुंबई ही महाराष्ट्राची नाही, असं भासवून मुंबई पुन्हा तोडण्याचा डाव सुरू झालाय. त्यामुळे मुंबईकरांनी आता गाफील राहून चालणार नाही.”

“उद्धवजी, मुंबई आदित्यकडे सोपवा अन्…”

एकीकडे भाजपवर प्रहार करताना दुसरीकडे जयंतरावांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या भाषणाचं भरभरून कौतुक केलं. “उद्धवजी, तुम्ही यायला उशीर केलात, पण मी आदित्यचं भाषण ऐकलं. मुंबईची नस आणि मुंबईला काय हवंय, याची अचूक जाण त्याला आहे. त्यामुळे आता मुंबईची जबाबदारी आदित्यवर सोपवा आणि तुम्ही निवांत होऊन महाराष्ट्राकडे लक्ष द्या,” असा मोलाचा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) दिला.

भावकी एक झाली, आनंद झाला!

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांना एकाच मंचावर पाहून जयंत पाटीलही भारावून गेले. “आजच्या मंचावरील पोस्टर पाहून आनंद होतोय की भावकी एक झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज तुमच्याकडे बघतोय,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच, १९६६ मध्ये बाळासाहेबांची पहिली सभा याच मैदानावर झाली, तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) कट्ट्यावर बसून भाषण ऐकत होते, हा जुना संदर्भ देत त्यांनी शिवसैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला. “आज शत्रू वेगळा आहे, काही गद्दार आहेत तर काही दिल्लीचे गुलाम आहेत, पण मुंबईकर त्यांना खड्यासारखं बाजूला करतील,” असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)