🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड: राजकारणात नेमकं कोण कोणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेल हे सांगता येत नाही, पण पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या जे घडतंय, त्याने महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भाजप आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिलं होतं. आता या ‘एकेरी’ हल्ल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत अत्यंत खोचक आणि मार्मिक उत्तर दिलंय, ज्यामुळे लांडगे नक्कीच गारद होतील.
“आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत…”
भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी अजित पवारांच्या जुन्या डायलॉगची मिमिक्री करत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. “आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर करेक्ट कार्यक्रम करतो… अरे, तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का? आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील,” अशा शब्दांत लांडगेंनी अजितदादांना एकेरी भाषेत सुनावले होते. “तू माझ्या वाकड्यात शिरलायस,” अशी धमकीवजा भाषाही त्यांनी वापरली होती.
Ajit Pawar Reply to Mahesh Landge
अजितदादांचं ‘कूल’ उत्तर लांडगेंच्या या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार भडकतील असं वाटलं होतं, पण घडलं भलतंच! आज पत्रकारांनी जेव्हा लांडगेंच्या एकेरी भाषेबद्दल विचारलं, तेव्हा दादांनी अतिशय शांतपणे पण बोचरा वार केला. अजित पवार मिश्कील हसून म्हणाले, “अरे, तो मोठा नेता आहे. तुला माहित नाही का? मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं.”
दादा पुढे म्हणाले, “आपण घरात आपल्यापेक्षा लहानांना- गडीमाणसाला कसं सांगतो? ‘ए पाणी आणून दे रे’ असंच म्हणतो ना? कुणी ‘पाणी आणून देता का हो’ असं म्हणत नाही. त्यामुळे तो मोठा नेता आहे आणि त्याला अजित पवार ‘चिल्लर’ वाटतोय, म्हणून तो माझा एकेरी उल्लेख करतोय.” अजित पवारांच्या या एका वाक्याने लांडगेंना त्यांची जागा दाखवून दिली, अशी चर्चा आता रंगली आहे.
तर दुसरीकडे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी थेट लांडगेंच्या बालेकिल्ल्यात घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. त्यांनी भोसरीत सलग चार तास बैठका घेत कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली. लांडगेंवर एक शब्दही न बोलता, फक्त कृतीतून “आम्ही पण तयार आहोत” असा इशाराच पवार कुटुंबीयांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईचा ‘चेहरा’ बदलण्याचा डाव? लोकसंख्येचं गणित अन् ‘ते’ धक्कादायक दावे; राजकीय वर्तुळात खळबळ!
- ‘आता किसिंग नको, चक्की पिसिंग करा’; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘तोफ’गोळा!
- रोहित शर्मा खेळणार पण कॅप्टन नाही? पहिल्या वनडेसाठी भारताची ‘प्लेइंग ११’ ठरली; ‘या’ युवा स्टारला मोठी संधी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










