नागपूर, 11 ऑक्टोबर: अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आजीचे निधन झाल्यानंतर चुलत भावाचा नंबर शोधण्यासाठी आपण केवळ दोन मिनिटांसाठी फोन मागितला होता, मात्र पोलिसांनी तो दिला नाही. तसेच वकिलाशी बोलण्याचा कायदेशीर अधिकारही आपल्याला नाकारण्यात आला, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. आजीच्या निधनामुळे दिल्लीहून नागपूर विमानतळावर परतल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या वागणुकीचा पाढा वाचला.
पहाटे साडेतीन वाजता दिल्ली पोलिसांनी येऊन ‘तुला अटक झाली आहे, हे आई-वडिलांना फोन करून सांग’, असे फरमावले. हा प्रकार केवळ भीती निर्माण करण्यासाठी होता, असे दिपके म्हणाले. विमानातून थेट उचलून अटक करण्याच्या कारवाईवर संताप व्यक्त करत, ‘गेल्या ७० वर्षांत अशी अटक कोणाला झाली आहे का? आम्ही काय दहशतवादी होतो का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अटक झाली त्यावेळी आपण महात्मा गांधींचा टी-शर्ट घातलेला होता, असेही त्यांनी नमूद केले.
ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी संपूर्ण दिल्ली, रस्ते आणि मेट्रो बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कोर्टात आपण काहीही लिहून दिलेले नाही किंवा कोणताही बाँड साईन केलेला नाही, असे स्पष्ट करत लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. शंभर वेळा तुरुंगात टाकले तरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची हुकूमशाही सहन करणार नाही, असे दिपके (Abhijeet Dipke) यांनी ठणकावून सांगितले.
आंदोलनातील लहान मुले आणि मुलींना मारहाण केली जात असल्याचा दावा करत, पोलिसांनीही आता विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. असेच सुरू राहिले तर मोदी आणि शहा यांच्या सांगण्यावरून दिल्ली पोलीस एक दिवस आंदोलकांचा खूनही करू शकतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. एसीपी विनय भगत यांच्यावर आरोप करत, अमित शहांनी दिल्ली पोलिसांमध्ये गुंडांचे प्रमोशन केल्याचा घणाघात त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारे आपण लोक असून, हुकूमशहा जातील तेव्हाच देश बदलेल, असा विश्वास दिपके यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- नांदेडमध्ये अवैध रेती माफियांवर पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अभिजीत दिपकेंपासून आजीच्या निधनाची बातमी लपवली? दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ दाखवत दिले स्पष्टीकरण
- ‘तो सज्जन माणूस नव्हता…’, नाना पाटेकर यांच्याबद्दल तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









