पैठण : किरण काळे पाटील: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांसह सुरक्षा दलातील अनेक जवान आणि निष्पाप नागरिकांनी प्राणांची आहुती दिली होती. शहीदांच्या स्मृती केवळ श्रद्धांजलीपुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येत आहे.
रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी केले आहे.








