पुणे, 18 नोव्हेंबर: पुण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा भिडे पूल गुरुवार (दि. १९) सकाळी ६ वाजेपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणाऱ्या एका नवीन पादचारी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत बंद राहणार आहे.
मुख्य भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असला, तरी नदीपात्रातील रस्ता मात्र वाहनांच्या ये-जा करण्यासाठी खुला ठेवण्यात येणार असल्याचे पुणे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुठा नदीवरील भिडे पुलावरून हा नवा पादचारी पूल उभारला जात आहे.
या नव्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील रहिवाशांना, तसेच या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे.
भिडे पूल बंद असलेल्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. यासाठी नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा (Z Bridge) वापर करावा. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, या दीड महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती मेट्रोने केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांना शिवसैनिकांचा विरोध; ‘पन्नास खोके’च्या घोषणाबाजीने वातावरण तापले
- खरा हिंदू म्हणून… ‘पप्पांच्या मांडीवर मम्मी’ वक्तव्यावरून झालेल्या टीकेवर राहुल गांधींचा भाजपवर पलटवार
- पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी शेन डिएट्झ यांची नियुक्ती







