दौंड, 17 नोव्हेंबर: दौंड तालुक्यातील सोनवडी गावात एका ३१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अडीच महिन्यांपूर्वी आईचा विनयभंग केल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी दौंड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अरुण अनिल पवार (वय ३१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अरुण कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रस्त्यावरून एकटाच जात होता. यावेळी आरोपींनी त्याला गाठून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अरुणचा मृत्यू झाला.
सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी मयत अरुणने आरोपी दिनेश विजय पवार (वय २०) याच्या आईचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या कारणावरून दिनेशच्या मनात प्रचंड राग होता. यातूनच दिनेशने त्याचा साथीदार रुपेश मिथुन राठोड याच्यासोबत संगनमत करून या खुनाचा कट रचल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हे दोन्ही आरोपी सोनवडी येथीलच रहिवासी आहेत.
या घटनेनंतर सुनील अनिल पवार (वय ३३, रा. सोनवडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दिनेश पवार आणि रुपेश राठोड या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- रत्नागिरीत ACB ची मोठी कारवाई; पोर्ट क्लिअरन्सच्या लाचेप्रकरणी मेरीटाईम बोर्डाच्या ‘क्लास वन’ अधिकाऱ्याला बेड्या
- शिवसेना सुनावणी: ॲड. ध्रुव मेहतांचा युक्तिवाद; योगेश कदम ते दादा भुसेंच्या सह्यांचा उल्लेख
- रोहित पवारांच्या ‘मफलर मॅन’ आरोपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवर पलटवार








