लातूर, 18 नोव्हेंबर: लातूर जिल्ह्यातील खलंगरी येथील एका शेतकऱ्याने घेतलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाचा हप्ता थकल्याने एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज वसुलीसाठी एका महिला अधिकाऱ्याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरत थेट शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलीला विकण्याची भाषा केली आहे. या अर्वाच्च शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
खलंगरी गावातील शेतकरी सतीश बोळंगे यांनी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यातील २२ हजार रुपयांचा हप्ता त्यांना वेळेवर भरता आला नाही. यामुळे संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच्या महिला रिकव्हरी ऑफिसरने जामीनदाराला फोन करून अत्यंत गलिच्छ शब्दांत शिवीगाळ केली आणि बायका-लेकरांना विकण्याबाबत वक्तव्य केले.
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, या व्हायरल क्लिपमुळे मायक्रो फायनान्स कंपन्या शासनाचे आदेश कसे धाब्यावर बसवत आहेत आणि किती नीच पातळीवर जाऊन वसुली करत आहेत, याचे विदारक सत्य समोर आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








