सोलापूर, 11 नोव्हेंबर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बिरोबा यात्रेत मराठा समर्थक आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. आडेगाव येथे देवदर्शनासाठी गेलेल्या हाके यांच्या उपस्थितीवर मराठा समर्थकांनी आक्षेप घेत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही इथे कशाला आलात?’, असा जाब विचारत विरोध केल्याने सुरुवातीला झालेली शाब्दिक चकमक नंतर हाणामारीत बदलली.
पोखरापूर येथील बिरोबा यात्रेत सहभागी झाल्यानंतर लक्ष्मण हाके जवळच्याच बिरोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी पुजाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांचा सत्कार सुरू होता. तेव्हा माईकवर बोलणाऱ्या व्यक्ती आणि समोर बसलेल्या काही लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही जण थेट अंगावर धावून आले. यावेळी हाके यांच्या कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती असल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार झटापट झाली.
या घटनेचा तीव्र निषेध करत लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे. “आमच्यासोबत पोलीस बंदोबस्त असताना आणि देवाच्या गाभाऱ्यात असताना विनाकारण अंगावर येण्याची ही कुठली मानसिकता आहे? आम्ही आता कुठे फिरायचेच नाही का? देवदर्शनालाही जायचे नाही का? नक्की अडचण काय आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अंगावर धावून आलेल्यांना आपल्या कार्यकर्त्यांनीही प्रतिकार केल्याचे ते म्हणाले.
आपला तिथे कोणताही कार्यक्रम किंवा भाषण नव्हते, असे हाके यांनी स्पष्ट केले. “राज्यातील वातावरण सुरळीत होत असताना केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी हा प्रकार केला आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या गावखेड्यातील यात्रांमध्ये कोणतीही जात, धर्म किंवा पंथ नसतो,” असे ते म्हणाले. अशा धमक्यांना आपण घाबरणार नसून, शोषित, वंचित, आदिवासी आणि ओबीसींचा लढा यापुढे अधिक तीव्र करू, असा इशाराही हाके यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात दुहेरी हवामान: रात्री गारठा तर दिवसा उन्हाचा चटका, हवामान विभागाचा नवा अंदाज
- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ मधून हार्दिक पंड्या बाहेर; बडोदा संघाचे नेतृत्व कृणालकडे
- सतेज पाटलांचे वडील स्कुटरवर फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू होतात का?; धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








