प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सध्या कोल्हापूरच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला आता शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरून फिरायचे, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेताना धंगेकर यांनी, “तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का?” असा बोचरा सवाल विचारला आहे.
मंगळवारी गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाली. या निवडणुकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘बंटी तू बंटीच राहिलास, कधी साहेब झाला नाहीस,’ असे म्हणत त्यांनी सतेज पाटलांच्या कुटुंबाच्या वाढत्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकेकाळी डी. वाय. पाटील कोल्हापुरात स्कुटरवरून फिरायचे, मग आता एवढी संपत्ती कुठून आली? गोकुळची सत्ता त्यांना फक्त मलई खाण्यासाठी हवी आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
या आरोपांवर पलटवार करताना रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली. सतेज पाटील यांचे वडील स्कुटरवर फिरायचे हे ठीक आहे, पण महाराष्ट्राने तुमचीही परिस्थिती पाहिली असल्याचे धंगेकर म्हणाले. कुणीतरी हॉटेलच्या आत नेऊन चहा पाजेल, यासाठी तुम्ही शबनम झोळी घेऊन हॉटेलबाहेर वाट पाहत बसायचात, असा टोला त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांच्या भाषेची तुलना धंगेकर यांनी थेट ‘नळावरच्या भांडणाशी’ केली. सत्तेचा अमरपट्टा कुणीही आणलेला नसून सत्ता कोणाची मांडलिक नसते, याची आठवण त्यांनी करून दिली. “तुम्ही जी दमदाटी करताय, ती जनता पाहत आहे. लोक चौकाचौकात तुमचे मनगट धरतील, तेव्हा उत्तर देताना तुमचे नाकीनऊ येईल. तुमचे धोतर, चष्मा आणि केस वेगवेगळ्या बाजूला पडतील, तो काळ आता फार लांब नाही,” असा थेट इशारा धंगेकर यांनी दिला. हा महाराष्ट्र शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा असून येथे दमदाटी चालणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- रत्नागिरीत गिफ्ट दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या बंबात पाणीच नसल्याने नागरिकांचा संताप
- जन्मदात्या बापाकडून १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आईने बसवलेल्या सिक्रेट कॅमेऱ्यातून प्रकार उघड
- मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; कारकीर्दीतील ३ सर्वोत्तम कामगिरी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








