प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने १४ चेंडूत अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड यांच्यात झालेल्या वनडे कप सामन्यात त्याने ही ऐतिहासिक खेळी केली. मॅकगर्कच्या या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ७ गडी गमावून ३९७ धावांचा मोठा डोंगर उभारला.
अॅडलेड येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या या २४ वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने तुफानी फटकेबाजी केली. १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने अवघ्या ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने एकूण ६३ चेंडूंचा सामना करताना तब्बल १० चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १२२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मॅकगर्कचे हे १४ चेंडूंतील अर्धशतक कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाने अधिकृत क्रिकेट सामन्यात (लिस्ट ए, प्रथम श्रेणी आणि टी-२०) झळकावलेले सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.
क्वीन्सलँडविरुद्धच्या डावाची सुरुवातच मॅकगर्कने आक्रमक पद्धतीने केली होती. डावाच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या टॉम स्ट्रेकरच्या षटकात त्याने २२ धावा कुटल्या. त्यानंतर चौथ्या षटकात टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर त्याने १६ धावा वसूल केल्या.
या विक्रमी खेळीसह मॅकगर्कने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) त्याने दोनदा १५ चेंडूत अर्धशतके झळकावली होती (मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध). ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या वेगवान अर्धशतकांच्या यादीत आता जेक फ्रेझर-मॅकगर्क अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत डॅन ख्रिश्चन दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २०२० च्या बिग बॅश लीगमध्ये होबार्ट येथे अॅडलेड स्ट्राईकर्सविरुद्ध १५ चेंडूत अर्धशतक केले होते. त्यानंतर पुन्हा मॅकगर्कची दोन अर्धशतके आहेत, जी त्याने २०२४ मध्ये दिल्लीत खेळताना अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद (२० एप्रिल) आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध (२७ एप्रिल) १५ चेंडूत झळकावली होती. या यादीत ट्रॅव्हिस हेडचाही समावेश असून त्याने २० एप्रिल २०२४ रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक केले होते.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये हा नवा विक्रम असला तरी, 'लिस्ट ए' क्रिकेटच्या एकंदरीत इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक नाही. या यादीत भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानावर आहे. वैभवने २१ जून २०२६ रोजी श्रीलंकेत डंबुला येथे श्रीलंका अ संघाविरुद्ध केवळ ११ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकांच्या यादीत वैभव सूर्यवंशीनंतर कौशल्या वीररत्ने (१२ चेंडू, विरुद्ध कुरुणेगाला, कोलंबो, १ नोव्हेंबर २००५), थिसारा परेरा (१३ चेंडू, विरुद्ध ब्लूमफील्ड, पानागोडा, २८ मार्च २०२१), आणि रॉरी क्लेनवेल्ट (१४ चेंडू, विरुद्ध क्वाझुलु-नताल, डर्बन, २० मार्च २०११) यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर जेक फ्रेझर-मॅकगर्कने १७ ऑक्टोबर २०२६ रोजी क्वीन्सलँडविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक केले. तर अॅडम होलिओके (यॉर्कशायरविरुद्ध, स्कारबोरोग, ११ सप्टेंबर १९९४), सलमान बट (लाहोर ईगल्सविरुद्ध, लाहोर, २८ मार्च २००९), परवेझ हुसेन इमॉन (शाइनपुकुर क्रिकेट क्लबविरुद्ध, सावर, ६ एप्रिल २०२५) आणि सरफराज खान (पंजाबविरुद्ध, जयपूर) या फलंदाजांनी प्रत्येकी १५ चेंडूंत अर्धशतके झळकावली आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२७ पूर्वी महेला जयवर्धने यांचा राजीनामा; मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकांसाठी नावांची शॉर्टलिस्ट
- अटकेनंतर अभिजीत दिपकेंना रामदास आठवलेंची पुन्हा मोठी ऑफर; थेट RPI मध्ये येण्याचे निमंत्रण
- संजू सॅमसनला डावलून भारतीय संघात संधी मिळालेला कुमार कुशाग्र कोण आहे?
Quick Answers
जेक फ्रेझर-मॅकगर्कने केवळ १४ चेंडूत अर्धशतक झळकावून ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतकाचा नवा विक्रम केला.
मॅकगर्कने ६३ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १२२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
मॅकगर्कच्या खेळीच्या जोरावर दक्षिण ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ७ गडी गमावून ३९७ धावा केल्या.
'लिस्ट ए' क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक भारताच्या वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे, ज्याने अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक केले होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








