दिल्ली, 15 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) प्रमुख अभिजीत दीपके यांनी दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि एनडीएमसीने दिलेल्या सूचनेनुसार, प्रशासकीय कारणास्तव १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
दीपके यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन सेंट्रल पार्कमध्ये जमावे, असे आवाहन केले होते. त्यांनी या आंदोलनाला 'लेहरा दो तिरंगा' असे नाव दिले असून, आम आदमी पक्षानेही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर एनडीएमसीने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून उद्यानाची सुरक्षा निश्चित करण्याची मागणी केली आहे. हे उद्यान अत्यंत संवेदनशील असून तेथे अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यापासून रोखावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. सध्या कॅनॉट प्लेस परिसरात बीएनएसएसचे (BNSS) कलम १६३ लागू करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
कलम १६३ चे उल्लंघन करून नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, योग्य ठिकाणी केवळ ११ जणांच्या गटाला राष्ट्रध्वज घेऊन राष्ट्रगीत गाण्याची परवानगी देण्याची व्यवस्था केली जाऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सीजेपीचे सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दीपके यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली होती. जंतर मंतरवर अनधिकृत प्रवेश, जामीन अटींचे उल्लंघन आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली असून ते सध्या तिहार तुरुंगात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरल्यास कायदेशीर कारवाई; विनायक राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
- उमेदवार देण्याचा प्रश्न शरद पवारांचा; सुनील तटकरेंचे अर्थखात्याच्या मागणीवरून मोठे वक्तव्य
- शेतकऱ्यांसाठी ५ हजारांची मदत अपुरी; वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार – सुनील तटकरे
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








