मुंबई, 11 ऑक्टोबर: दादरच्या शिवाजी पार्कवर सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनापूर्वीच मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची अडवणूक केली. दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.
पोलिसांच्या सुरू असलेल्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. विनाकारण ताब्यात घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी करत त्यांनी पोलिसांना जाब विचारला. जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या सर्वांना सोडले जात नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांसाठी एवढा बंदोबस्त कशासाठी, असा सवाल उपस्थित करत अमित ठाकरेंनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. “मी आजपर्यंत असं शिवाजी पार्क पाहिलं नाही. चालता चालता मला पोलिसांनी थांबवलं. आता सामान्य नागरिकांनी पार्कमध्ये राऊंड पण मारायचा नाही का? आम्ही इथले रहिवासी आहोत, हे रोज चालणार नाही,” असे ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले. तसेच आपण दिल्लीत नसून महाराष्ट्र पोलिसांचा आदर करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानेश कुमार या भ्रष्ट माणसाच्या विरोधात घोषणा देण्यासाठी निघालेले हे समर्थक अतिरेकी आहेत का, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्याबद्दल इतक्या गोष्टी समोर आल्यावर आम्ही बोलायचे नाही का, असेही ते म्हणाले. काल एकाला चक्क विमानात जाऊन अटक करण्यात आली, तो काय अतिरेकी होता का? असे म्हणत जे बोलत नाहीत, त्यांचीही अडवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपचे गुंड दिल्लीत मुलींना मारहाण करत असून, महाराष्ट्रातही आता दिल्लीसारखीच वाईट स्थिती निर्माण झाल्याचा घणाघात अमित ठाकरेंनी केला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महिलांवर हात टाकला जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “आज हा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून मनसैनिक रस्त्यावर येतील. उद्याही हे लोक येतील, तुम्ही त्यांना हात लावून दाखवा. इथे मला उद्यापासून पोलीस नको आहेत,” असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात परतताच अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा; मोदींवर हल्लाबोल करत जाहीर केला आंदोलनाचा प्लॅन
- दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, नेहा बोराने धावत्या बसमधून दाखवला पोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा
- CJP च्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मनसे, युवा सेना आक्रमक; अमित व आदित्य ठाकरेंनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








