प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: निवडणूक प्रक्रियेतील (SIR) कथित गैरव्यवहार आणि देशभरात सुरू असलेल्या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरणार असून, येत्या सोमवारपासून राज्यभर सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. सध्या काँग्रेससह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी SIR प्रक्रियेविरोधात सातत्याने आवाज उठवत असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेनेही राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
“सोमवारी जागोजागी सह्यांची मोहीम करत आहोत. पुढचा आठवडा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आलेली दिसेल. यासाठी आम्हाला जेलमध्ये टाका, वाटेल ते करा. आज जर आवाज उठवला नाही तर लोकशाहीचा गळा घोटला जात असताना तुम्ही कुठे होतात? असा प्रश्न पुढची पिढी विचारेल,” असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. ही मोहीम केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर चालवली जाईल, असे सांगत त्यांनी सर्वांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली असता, अभिजीत दीपके यांना विमानातच अटक करण्यात आली. या कारवाईचा संदर्भ देत देशपांडे म्हणाले, “अभिजीत दीपके याने मर्डर किंवा रेप केला आहे का? त्याला किती दिवस डिटेन करून ठेवणार? सरकारने त्यांना जे करायचे ते करावे, आम्ही आमचे काम करू. आज आवाज दाबलात तर परवा पुन्हा आवाज करू. आम्हाला रोज पोलीस दिसतात, आम्हीही त्यांना बघतो, जे करायचंय ते करा.”
मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गेले काही दिवस SIR मध्ये घोळ झाल्याचे आपण पाहतोय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणूनच हे केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे कोणतेही आदेश दिले नव्हते,” असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. हा थेट लोकशाहीचा खून असून, नागरिकांच्या मनातील चीड व्यक्त करण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले.
गर्जना मोर्चानंतर मनसे थांबली नसल्याचे सांगत सरदेसाई यांनी पुढील दिशा स्पष्ट केली. “सोमवारी सकाळी सर्व ठिकाणी राबवली जाणारी सह्यांची मोहीम हा आमचा पहिला टप्पा असेल. सर्वसामान्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे. त्यानंतर दसऱ्यापर्यंत आम्ही काय करू हे तुम्हाला कळेल,” असा इशारा त्यांनी दिला. सध्या दिल्लीत विचित्र पद्धतीने दडपशाही सुरू असून ट्रेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाबद्दल कोणी काहीही बोलायचे नाही, अशी यापूर्वी न पाहिलेली दडपशाही सुरू असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दिपकेंचा मानसिक छळ? सीजेपीच्या आरोपाने खळबळ
- राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात, म्हणाले- ‘या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय!’
- पांढऱ्या शर्टच्या कॉलरवरील पिवळे डाग कसे काढायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








