नवी दिल्ली, २३ सप्टेंबर: केंद्रीय निवडणूक आयोगात फूट पडल्याच्या वृत्तानंतर ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याकडे बहुमत नसल्याचा दावा करत, त्यांनी घेतलेले सर्व एकतर्फी निर्णय रद्द करण्याची, त्यांना निलंबित करण्याची आणि सद्यस्थितीत सुरू असलेली विशेष सखोल मतदार पडताळणी (SIR) प्रक्रिया त्वरित थांबवण्याची मागणी सिब्बल यांनी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे इतर दोन सदस्य सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांना डावलून एकतर्फी निर्णय घेत आहेत. या दोन आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत १४ वेळा ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर आक्षेप नोंदवत थेट कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेत आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्यघटनेच्या कलम ३२४ मधील दुरुस्तीचा संदर्भ देत सिब्बल म्हणाले, “निवडणूक आयोगाचे निर्णय बहुमताने घेतले जाणे बंधनकारक आहे. मात्र, २५ जून २०२५ नंतरचे बहुतांश निर्णय बहुमताने घेतलेले नाहीत. दोन आयुक्तांनी आक्षेप नोंदवूनही मुख्य आयुक्तांनी मनमानीपणे निर्णय घेतले. जर निर्णय बहुमताने घेतले गेले नसतील, तर तो आयोगाचा अधिकृत निर्णय मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय अवैध आणि रद्दबातल घोषित करण्यात यावेत”.
ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करताना सिब्बल यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. “ज्ञानेश कुमार यांच्या बाजूने बहुमत नाही हे आज स्पष्ट झाले आहे. ते त्यांच्या मनमर्जीने वागत आहेत. निवडणुका कशा घ्यायच्या, कोणता अर्ज भरायचा हे ते एकटेच ठरवत होते,” असा आरोप त्यांनी केला. या मनमानी कारभाराचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होत असल्याचे सांगत सिब्बल यांनी देशभरात राबवली जाणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रोखण्याची मागणी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी निर्णयांवरून आयोगात फूट; दोन आयुक्तांची कॅबिनेट सचिवांकडे तक्रार
- मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढणार? कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
- रशियन तेलावरून भारताला शिक्षा देऊ नका; ट्रम्प यांच्या नव्या निर्बंधांनंतर जेपी मॉर्गनच्या सीईओंचा अमेरिकेला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











