Share

थरार: मुरुम माफियांनी मुरुम खाली ओतला अन् पोलिसांसमोरून पळवला हायवा, चौघांवर गुन्हे दाखल

बिडकीनमध्ये बेकायदेशीर मुरुम वाहतूक करणाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी पोलिसांच्या गाडीला कार आडवी लावली आणि डोळ्यादेखत हायवा पळवून नेला. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल.

Published On: 

Bidkin crime police action against illegal murum transport hyva truck

बिडकीन, २३ सप्टेंबर: बिडकीन (ता. पैठण) येथील डीएमआयसी (DMIC) परिसरात बेकायदेशीर मुरुम  (illegal Mining) वाहतूक करणाऱ्या एका हायवा ट्रकवर कारवाई करत असताना धक्कादायक प्रकार घडला आहे. कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी पोलिसांच्या गाडीला कार आडवी लावून शासकीय कामात अडथळा आणला. त्यानंतर हायवा मालकाने स्वतः ट्रक सुरू करून मुरुम खाली ओतला आणि ट्रक घेऊन पळ काढल्याची माहिती पोलिसांच्या प्रथम माहिती अहवालातून (FIR) समोर आली आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

बिडकीन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांना डीएमआयसी परिसरात जे.सी.बी.च्या साहाय्याने मुरुम भरून चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलीस हवालदार वाल्मिक निकम आणि वाजेद शेख यांनी २१ सप्टेंबर रोजी निलजगाव रोडवर कारवाई केली. त्यांनी ‘जय भवानी’ असे लिहिलेला एक निळ्या-पांढऱ्या रंगाचा हायवा ट्रक अडवला. चालक प्रसाद मुळे याच्याकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये ६ ब्रास मुरुम असल्याचे आढळले. या मुरुमाची कोणतीही रॉयल्टी त्यांच्याकडे नव्हती. निलजगाव येथील वसीम शेख याच्या जे.सी.बी.ने हा मुरुम भरल्याची कबुली चालकाने दिली.

कारवाई टाळण्यासाठी पोलिसांच्या गाडीला कार आडवी लावली

पोलिसांनी हा ट्रक जप्त करून पोलीस ठाण्यात नेण्याची प्रक्रिया सुरू केली असता, ऋषी गवारे नावाचा व्यक्ती लाल रंगाची स्विफ्ट कार (Swift VDI) घेऊन तिथे आला. त्याने पोलिसांच्या मार्गात कार आडवी लावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. रात्री साडेआठच्या सुमारास हायवाचा मालक सचिन मोहन गवारे हा काळ्या रंगाच्या थार गाडीतून (MH.20-3336) घटनास्थळी पोहोचला. त्याने पोलिसांना ‘साहेबांशी बोलतो’ असे सांगून वेळ काढला आणि मोबाईलमधील जीपीएस (GPS) सिस्टीमच्या साहाय्याने हायवाचे इंजिन बंद करून टाकले.

हायवा मालकाचा बनाव

पोलिसांनी कायदेशीर कारवाईसाठी ट्रक पोलीस ठाण्यात नेणे बंधनकारक असल्याचे ठणकावून सांगितल्यानंतर, सचिन गवारे याने स्वतः ट्रक बिडकीन पोलीस ठाण्यात नेण्याचे नाटक केले. त्याने ट्रक सुरू केला, मात्र डीएमआयसी परिसरातच ट्रकचे फाळके हायड्रॉलिकने वर करून आतील संपूर्ण मुरुम खाली ओतला. त्यानंतर पोलिसांच्या डोळ्यादेखत त्याने ट्रक पोरगावच्या दिशेने पळवून नेला. पोलिसांनी मोटरसायकलवरून त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी मुरुम टाकलेल्या जागेचे अक्षांश-रेखांश (Lat-Long) घेऊन पुरावे गोळा केले आहेत.

या प्रकरणी पोलीस हवालदार वाल्मिक निकम यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा चालक प्रसाद मुळे (रा. ढोरकीन), मालक सचिन गवारे, ऋषी गवारे (दोघे रा. बिडकीन) आणि जे.सी.बी. मालक वसीम शेख (रा. निलजगाव) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम 303(2), 221, 3(5) आणि खाण व खनिज अधिनियम १९५७ च्या कलम 21(1), 21(2) नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ जाधव करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही