Eid e Milad un Nabi: सण कोणताही असो, बिडकीनकरांचा उत्साह नेहमीच शिगेला पोहोचलेला असतो. यंदाही असंच काहीसं मनमोहक चित्र पाहायला मिळालं. पैठण तालुक्यातील बिडकीन शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा झाला. भव्य जलूस, अलोट गर्दी आणि डोक्यावर मानाचे फेटे. हे दृश्य खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी ८ वाजताच या जल्लोषाला सुरुवात झाली. नुरानी मस्जिदपासून निघालेल्या या जलूसमध्ये मुस्लिम बांधव आणि विशेषतः तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मदिना मस्जिद, बसस्थानक, सादत चौक, हवालदार गल्ली, ग्रामपंचायत ते थेट शेकटा फाट्यापर्यंत हा जलूस फिरला. आणि शेवटी पुन्हा नुरानी मस्जिद येथे त्याची अतिशय शांततेत सांगता झाली.
ईद-ए-मिलादुन्नबीचा जल्लोष आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त
या जलूसचं खास आकर्षण ठरले नाशिकहून आलेले प्रमुख पाहुणे
नातख्वान सय्यद शहबाज रजा आणि सय्यद अब्दुल रहमान यांच्या उपस्थितीने या धार्मिक सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. दुसरीकडे, ग्रामपंचायत सदस्य मिनाज भाई इनामदार यांनी सहभागी भाविकांना स्वतः फेटे बांधून त्यांच्या उत्साहात मोठी भर घातली. विशेष म्हणजे जलूसमध्ये लहान मुलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी, गोड भात आणि शिऱ्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. नुरानी आणि मदिना मस्जिद कमिटीने या संपूर्ण कार्यक्रमाचं अतिशय चोख नियोजन केलं होतं. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळेच हा संपूर्ण सोहळा अत्यंत शांततेत आणि जल्लोषात पार पडला.
ईद-ए-मिलादुन्नबी हा भारतभरात अतिशय उत्साहात आणि श्रद्धेने साजरा होणारा मुस्लिम बांधवांचा एक पवित्र सण आहे. इस्लामचे संस्थापक आणि अल्लाहचे प्रेषित मानले जाणारे पैगंबर मुहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ‘रबी अल-अव्वाल’ या तिसऱ्या महिन्यात हा पवित्र दिवस येतो.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील पेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तमिजुद्दीन इनामदार, पंचायत समिती सदस्य लतीफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य मेहमुद शहा, कौसर मिर्झा, काझी मुनिरोद्दीन, सय्यद असलम, आसिफ पठाण, शौकत सय्यद, शौकत पठाण, आजम शेख, फेरोज शेख, सद्दाम इनामदार, अफसर शेख, लियाकत पठाण, जाहीर पठाण, अख्तर शहा, शेख अनसर सर, फेरोज इनामदार, शफीक शेख, गौस सय्यद, महेबुब पठाण, मौलाना निजाम इनामदार, मौलाना तारिक अन्वर, हाफिज आमीर, हाफिज वसीम, हाफिज इम्रान खान, फारुख सय्यद, शेख शब्बीर भाई, हाफिज इनामदार, सद्दाम पटेल, अनिस पठाण यांच्यासह बिडकीन शहरातील सर्व समाजातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जलूस उत्साह, बंधुभाव आणि शांततेच्या वातावरणात पार पडल्याने आयोजकांनी सर्व सहभागी नागरिकांचे तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
📌 महत्वाच्या बातम्या
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
- गुटखा माफियांचा पर्दाफाश! स्कॉर्पिओतून गुटखा तस्करी, ५ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











