उत्तर प्रदेश, 22 नोव्हेंबर: उत्तर प्रदेशमध्ये येत्या २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपूर्ण राज्यातील तब्बल ७५ जिल्ह्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. युद्धासारखी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला कसे सामोरे जायचे, याचा सराव करण्यासाठी राज्यभरात एक विशेष ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आधीच अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या नियोजित मॉक ड्रिलनुसार, सायंकाळी वीज गेल्यानंतर हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारा सायरन सलग दोन मिनिटे वाजवला जाईल. सायरनचा आवाज ऐकताच नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या जातील. त्यानंतर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन पथके बचाव कार्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतील.
युद्धाच्या काळात नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा, याचे प्रात्यक्षिक या माध्यमातून दाखवले जाणार आहे. या काळात संपूर्ण राज्य अंधारात बुडणार असून, जिल्हा प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आणीबाणीचा हा सराव पूर्ण झाल्यानंतर धोका टळल्याची खात्री झाल्यावर परिस्थिती पूर्वपदावर आल्याचा दुसरा सायरन वाजवला जाईल. त्यानंतर तात्काळ खंडित झालेला विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे.






