प्रतिनिधी, 23 नोव्हेंबर: पुरुषांच्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात ‘इंडिया अ’ संघाला पाकिस्तान शाहीनकडून ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी ‘इंडिया अ’चा कर्णधार तिलक वर्माच्या संथ फलंदाजीवर कडक शब्दांत टीका केली आहे.
या सामन्यात विजयासाठी ३१४ धावांचे लक्ष्य पार करताना तिलक वर्माने शतक झळकावले, मात्र त्याची खेळी अत्यंत संथ होती. त्याने १४९ चेंडूंचा सामना करत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०० धावा केल्या आणि त्यानंतर अहमद दानियालच्या गोलंदाजीवर त्याने आपली विकेट गमावली. आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलकला आपल्या पहिल्या ३ धावा काढण्यासाठी २६ चेंडू खेळावे लागले. ३६ चेंडूंनंतर तो ८ धावांवर होता, तर ५२ चेंडूंमध्ये त्याने केवळ २२ धावा केल्या होत्या. विकेट वाचवणे गरजेचे असले तरी, त्याच्या संथ खेळीमुळेच संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे.
या रणनीतीवर बोट ठेवताना संजय बांगर यांनी निदर्शनास आणून दिले की, तिलकच्या या संथ फलंदाजीचा परिणाम दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजावरही झाला. स्वतः कर्णधार जोखीम घेण्यास तयार नसल्यामुळे, दुसऱ्या बाजूच्या फलंदाजालाही वेगाने धावा काढणे शक्य झाले नाही. तिलक डावाच्या उत्तरार्धात आवश्यक धावगती भरून काढण्याच्या विचारात होता. यावर बांगर म्हणाले, “तिलक वर्माने पहिल्या २५ चेंडूंमध्ये ३ धावा केल्या, त्यानंतर पुढच्या २५ चेंडूंमध्ये त्याने १२-१३ धावा केल्या. ५० चेंडू खेळून तुम्ही १८-२१ धावांपर्यंत पोहोचलात, तर दुसऱ्या बाजूला असलेल्या फलंदाजावर काय परिणाम होतो? तिलक शेवटी धावांची गती वाढवेल याबद्दल तो स्वतःला खात्रीशीर वाटत होता, पण दुसऱ्या फलंदाजावर याचा काय परिणाम होतो? तो धोका पत्करेल की त्याला धोका पत्करण्यास भाग पाडले जाईल? यातून विकेट गमावण्याची संधी निर्माण होते.”
भारताच्या या अति-बचावात्मक दृष्टिकोनामुळे पाकिस्तानला फिरकीपटू हसन नवाजची संपूर्ण १० षटके वापरण्याची संधी मिळाली. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी होती, आणि नवाजने १० षटकांत ४.५० च्या इकॉनॉमी रेटने ३ बळी घेतले. बांगर यांच्या मते, अशा खेळपट्टीवर धावा गोळा करण्यासाठी काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक होते. बांगर यांनी पुढे सांगितले की, “मला वाटते, भारताची मोठी चूक ही झाली की त्यांनी हसन नवाजला त्याची १० षटके पूर्ण करू दिली. अशा टर्निंग ट्रॅकवर नक्कीच डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांच्या संयोजनाचा वापर करण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता, ज्यामुळे स्ट्राईक रोटेट करणे अधिक सोपे झाले असते. तसे झाले असते तर पाकिस्तानला नवाजकडून सर्व १० षटके गोलंदाजी करून घेण्याची संधी मिळाली नसती.”








