प्रतिनिधी, 23 नोव्हेंबर: दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रविवारी एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत ‘इंडिया अ’ आणि ‘पाकिस्तान शाहीन’ यांच्यात महत्त्वाचा सामना झाला. या सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. भारताचा कर्णधार तिलक वर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समद यांनी एकमेकांशी हस्तांदोलन न करण्याचे (नो-हँडशेक) धोरण कायम ठेवले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्ये हस्तांदोलन न करण्याची भूमिका सुरूच आहे. या धोरणाची सुरुवात २०२५ च्या आशिया कप स्पर्धेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने केली होती. तोच कित्ता आता तिलक वर्मा आणि अब्दुल समद यांनीही गिरवला आहे.
याशिवाय, नाणेफेकीच्या वेळी काही गोंधळाचे प्रसंगही पाहायला मिळाले. पाकिस्तानचा कर्णधार समद याने ‘हेड्स’ असा कॉल दिला होता. नाणे खाली पडल्यानंतर अँकरने ते ‘टेल्स’ असल्याचे घोषित केले. मात्र, समद आणि तिलक या दोघांनीही खाली वाकून पाहिले. त्यानंतर समदने नाण्याकडे बोट दाखवत माईकमध्ये, “हे हेड आहे, हे हेड आहे,” असे म्हटले. तसेच, त्यानंतर समद स्वतःसोबत माईक घेऊन गेला, त्यामुळे तिलक जेव्हा बोलण्यासाठी पुढे आला तेव्हा त्याच्याकडे माईकच नव्हता.
या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचे ‘इंडिया अ’चे लक्ष्य आहे. यापूर्वीच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी प्रभावी मारा करत नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला अवघ्या २६ धावांत गुंडाळले होते आणि ३०६ धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता.








