सातारा, 22 नोव्हेंबर: साताऱ्यात महायुतीमधील भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानावर मिश्कील पलटवार केला आहे. ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे गोरे यांनाच विचारावे लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन,’ असा टोला देसाई यांनी लगावला.
साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपासूनच दोन्ही पक्षांत वाद पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठा गोंधळ उडाला होता आणि त्यात मंत्री देसाईंना पोलिसांकडून धक्काबुक्कीही झाली होती. जिल्हा परिषदेची ती जखम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (DCC) निवडणुकीत भरून निघाली, असा संदर्भ देत देसाईंनी सुरुवातीला नाव न घेता टीका केली होती. ‘काही जखमा वरवर बऱ्या झाल्यासारख्या दिसतात, पण खोलवर असलेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत, त्यासाठी जालीम औषध लागते,’ असे देसाई म्हणाले होते.
देसाईंच्या या ‘जालीम औषध’ विधानाला जयकुमार गोरे यांनी ‘अघोरी विद्येचा’ दाखला देत उत्तर दिले होते. ‘जखमांवर जालीम औषध लावले पाहिजे हे अगदी बरोबर आहे. पण कधी कधी अघोरी विद्येने जखमेला औषध द्यायचा प्रयत्न केल्यास ती बरी होतेच असे नाही, किंबहुना त्याचे परिणाम आणखी गंभीर होतात, हे समजून घेतले पाहिजे,’ असे गोरे म्हणाले होते. याच टीकेला आता देसाईंनी अघोरी बाबाचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिले आहे.
‘दम होता तर निवडणूक एकट्याने लढवायची,’ या गोरे यांच्या विधानाचाही देसाई यांनी समाचार घेतला. आम्ही कधीही दमाची भाषा केली नाही, पण कोणी वारंवार तसे बोलत असेल तर आकडेवारी सर्व काही स्पष्ट करते आणि यावर जाहीर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे देसाई यांनी ठणकावून सांगितले.
तालुक्याच्या ११ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने विजय मिळवला आहे. जिल्हा गटातील ५ जागांवरही हेच ठरावधारक मतदान करणार असल्याने आमची बाजू भक्कम असल्याचा दावा देसाई यांनी केला. महायुतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आल्याचा सर्वांना आनंद आहे. तसेच गोरे हे मंत्रिमंडळातील सहकारी असल्याने त्यांच्या स्वबळावरील निवडणुकीच्या वक्तव्यावर आपण अधिक भाष्य करणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- महिलेवर अत्याचार आणि १९ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला थेट दुबईतून अटक
- १९ वर्षीय युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं; ग्राहक आयोगाचा १५ हजारांचा दंड
- अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की; हायवा मालक व चालकावर गुन्हा








