सोलापूर, 19 नोव्हेंबर: सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत होऊ शकले नाही. साखर कारखानदार प्रतिटन ३ हजार १५० रुपये दरावर ठाम असून, ३ हजार ५०० रुपयांच्या मागणीवर शेतकरी संघटना अडून राहिल्यास कारखाने बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत शेतकरी संघटनांनी सुरुवातीला उसाला ३ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली. मात्र, एवढा दर देणे शक्य नसल्याचे कारखानदारांनी स्पष्ट केले. यावर मध्यस्थी करत पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाच्या वतीने पहिली उचल ३ हजार २५० रुपये आणि गाळप हंगाम संपल्यानंतर १०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच, याबाबतचे परिपत्रक काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी कारखानदारांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. दुसरीकडे, शेतकरी संघटना पहिली उचल ३ हजार ३०० रुपये, गाळप संपल्यावर १०० रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी १०० रुपये, असा एकूण ३ हजार ५०० रुपये दर देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
जिल्ह्यात सध्या कार्तिकी वारी असल्याने शेतकरी संघटना कारखानदारांच्या निर्णयाची दोन ते तीन दिवस वाट पाहणार आहेत. मात्र, त्यानंतरही निर्णय न घेतल्यास २२ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत या प्रश्नावर कोणता तोडगा निघतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- श्रीलंका अ विरुद्ध अफगाणिस्तान अ: एमर्जिंग आशिया कप २०२६ सामन्याची ड्रीम ११ प्रेडिक्शन आणि खेळपट्टीचा अहवाल
- IPL 2027 Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? पाहा सर्व १० फ्रँचायझींचे बजेट आणि रिक्त जागा
- आयपीएल २०२७ पूर्वी एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्समध्ये १२ टक्के मालकी हक्क मिळवण्याच्या तयारीत








