पैठण (किरण काळे पाटील): पैठण तालुक्यातील नांदर शिवारात दोन चिमुकल्या मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याच्या प्रकरणात सात वर्षीय आयुष उर्फ आर्यन सोमनाथ रोडगे याचा मृतदेह बुधवारी (ता. १८) सकाळी नऊच्या सुमारास कालव्यात सापडला. पाच वर्षीय श्याम रोडगे याचा शोध अद्याप सुरूच आहे. या प्रकरणी पाचोड पोलिसांनी संशयित वडील सोमनाथ उर्फ परमेश्वर दामोदर रोडगे (वय ४०) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी सकाळी डाव्या कालव्यावरील विद्युत मोटारी सुरू करण्यासाठी गेलेल्या काही तरुण शेतकऱ्यांना पाण्यातून एक मृतदेह वाहत येताना दिसला. त्यांनी तातडीने कालव्यात उड्या घेत मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांना माहिती दिली. पाचोड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. आयुषवर बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजता नांदर येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई सुषमा, आजोबा, नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास सोमनाथ रोडगे याने दोन्ही मुलांना वडापाव आणि चॉकलेट खाऊ घालण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर स्कूटीवरून बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने तो त्यांना जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ घेऊन गेला. तेथे त्याने मुलांना पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिमुकल्यांनी “पप्पा, आम्ही मरू… असे करू नका ना!” अशी विनवणी केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्याने दोघांनाही कालव्यात फेकून दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
कालव्यावरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने शेतकऱ्यांच्या दिशेने दगडफेक करत शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. कालव्यातील पाण्याचा वेग आणि प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत असून, दुसऱ्या बालकाचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.
सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सोमनाथने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलांच्या संगोपनावरून पत्नीशी वारंवार वाद होत असल्याने दोन्ही मुलांना संपवून त्यांचे मृतदेह कोणालाही सापडू नयेत म्हणून कालव्यात फेकल्याचे त्याने चौकशीत सांगितले. मुलांना संपवल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा आणि पत्नी सुषमा हिचाही जीव घेण्याचा विचार होता, मात्र ती सोबत न आल्याने तिचा जीव वाचल्याचे त्याने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
पत्नी सुषमा रोडगे (वय २७) यांनी दिलेल्या जबाबावरून पाचोड पोलिसांनी सोमनाथविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस निरीक्षक महादेव नाईकवाडे आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- IRCTC वर कन्फर्म तात्काळ तिकीट हवेय? बुकिंगपूर्वी नक्की करा या ५ आवश्यक सेटिंग्स
- स्वामींच्या कृपेने आज या राशींचे अडथळे होणार कायमचे दूर; जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य
- ऊस दराचा तिढा कायम: कारखानदार ३१५० रुपयांवर ठाम, शेतकरी संघटनांचा २२ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा








