प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका कथित दिग्दर्शकाला नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबईतून अटक केली आहे. रवी ऊर्फ रवींद्र गौतम रोकडे (वय ३९) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी आरोपी रवी रोकडे याने नांदेडमधील व्यावसायिक महेश कृष्णाजी तुतारे यांना फोनवरून एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, तुतारे यांनी पैसे देण्यास नकार दिला. या नकारानंतर आरोपीने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली.
या धमकीदरम्यान आरोपीने दावा केला की, तीन वर्षांपूर्वी कोरेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि चार आमदारांना एकाच दिवशी उडवण्याचा कट आपण आखला होता. तसेच, आपल्या पाठीशी मोठ्या लोकांचा हात असल्याचेही आरोपीने म्हटले आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप उघडकीस आली आहे.
या ऑडिओ क्लिप आणि फिर्यादी महेश तुतारे यांच्या तक्रारीवरून नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने तपास करत आरोपी रवी रोकडे याला मुंबईतून जेरबंद केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या संपूर्ण प्रकारावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “अशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. त्यात मला आणि नांदेडच्या चार आमदारांना मारण्याचा कट आखल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक झालेली असून, यासंदर्भात पोलिसांची चौकशी सुरू आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सत्ताधारी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतायत; फायनान्सवाल्यांना पैसे नाहीत सांगा: मनोज जरांगे पाटील
- ‘खरा आनंद’: महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव यांच्या भावुक पोस्ट
- ‘माझा आवडता खेळाडू’: आयपीएल निवृत्तीनंतर जसप्रीत बुमराहने महेंद्रसिंह धोनीला मानले आदर्श








