पनवेल, 14 नोव्हेंबर: नवी मुंबईच्या उलवे परिसरातील एका लॉजवर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या २३ वर्षीय प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही त्याच खोलीत गळफास घेत जीवन संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उलवे सेक्टर ९ मधील ‘हॅपी रेसिडेन्सी’ लॉजमध्ये ही घटना घडली. अक्षिता सत्यवीर चौधरी (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून, भारत पंकज भारद्वाज उर्फ गौरव (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी भारत आणि अक्षिता हे दोघे या लॉजवर आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरच्या सायंकाळी सहा ते १२ नोव्हेंबरच्या पहाटे एक वाजेच्या दरम्यान लॉजच्या रूम क्रमांक ३०१ मध्ये हा प्रकार घडला. भारतने नायलॉनच्या दोरीने अक्षिताचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी भारतला मृत घोषित केले. या प्रकरणी अक्षिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उलवे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजानी आणि तपास अधिकारी अनिल राजुले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. भारतने अक्षिताची हत्या करून आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस विविध शक्यता पडताळून सखोल तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








