जालना, 13 नोव्हेंबर: जालना जिल्ह्यातील टकले पोखरी गावात शेतात पुरलेले सोन्याचे सात हंडे शोधण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या परतूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत शेतमालकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले पोखरी येथील शेतकरी शिवलाल धोंडीराम राठोड याला आपल्या शेतात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय होता. हे हंडे बाहेर काढण्यासाठी त्याने अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही लोकांना बोलावून घेतले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी शेतात या अघोरी पूजेची मांडणी करण्यात आली.
याच दरम्यान, रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांना या प्रकाराची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विचारपूस आणि झाडाझडती घेतली. तेव्हा या संपूर्ण भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी लिंबू, नारळ, सुपारी, बदाम, कुंकू आणि इतर पूजेचे साहित्य जप्त केले आहे.
या प्रकरणी परतूर पोलिसांनी संबंधित नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे फोन टॅपिंगचे आरोप सत्य, ‘वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र…’ नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
- फोन टॅपिंगचे आरोप निराधार अन् बालिश; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात
- एल निनोचा प्रभाव: यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणार का? हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी नवा अलर्ट








