मुंबई, 13 नोव्हेंबर: वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी एक मोठा आर्थिक फटका बसणार आहे. राज्यातील गाय आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर चार रुपयांची वाढ (Milk Price Hike) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात पार पडलेल्या दूध उत्पादक व व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत या दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुण्यातील कात्रज डेअरीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला राज्यातील ४५ खासगी आणि सहकारी दूध ब्रँडचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत केवळ दुधाच्याच नव्हे, तर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दूध उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल आणि साखरेच्या दरातील वाढ, बाहेरील ब्रँड्सचे वाढते आक्रमण आणि डीलर रेट यामुळे दरवाढ करणे अपरिहार्य झाले होते. यासोबतच, हिरवा आणि सुका चारा, पशुखाद्य, पॅकेजिंग खर्च तसेच मालवाहतुकीच्या खर्चात झालेली मोठी वाढ ही दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.
या निर्णयापूर्वीच अमूलने १२ नोव्हेंबरपासून आपल्या दुधाच्या दरात २ ते ४ रुपयांची वाढ लागू केली आहे. अमूलचे ‘ताजा टोन्ड’ दूध दोन रुपयांनी, तर ‘अमूल गोल्ड’ दूध चार रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे मदर डेअरीनेही आपल्या दुधाच्या किमती २ ते ४ रुपयांनी वाढवल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणूक आणि अध्यक्षपदाच्या निवडीमुळे चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघानेही दरवाढीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गोकुळचे नूतन चेअरमन राजेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत गोकुळ दुधाचे दर वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एल निनोचा प्रभाव: यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणार का? हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी नवा अलर्ट
- करुणा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
- १६ नोव्हेंबरला नवे चक्रीवादळ धडकणार; हवामान विभागाकडून अनेक राज्यांना अलर्ट जारी








