पुणे, 14 नोव्हेंबर: मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही वेळ वाचवण्यासाठी घेतलेला शॉर्टकट या तरुणाच्या जिवावर बेतला असून, पाय घसरून सुमारे २०० फूट खोल दरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
साहीद अन्सारी (वय २०) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. मूळचा बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बैकटपूर येथील रहिवासी असलेला साहीद सध्या मुळशीतील ताथवडे येथे राहत होता. तो आपल्या चार मित्रांसोबत मुळशीतील प्लस व्हॅली आणि मिल्कीबार धबधबा परिसर पाहण्यासाठी गेला होता.
निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात या तरुणांनी नेहमीच्या सुरक्षित मार्गावरून जाण्याऐवजी एका ‘शॉर्टकट’चा अवलंब केला. हा मार्ग अत्यंत धोकादायक होता आणि तिथे तब्बल ४५ अंशांचा तीव्र उतार होता. याच उतारावरून खाली उतरताना साहीदचा अचानक पाय घसरला आणि तोल जाऊन तो थेट २०० फूट खोल दरीत जाऊन कोसळला.
तरुण दरीत पडल्याची माहिती मिळताच पौड पोलीस ठाण्याचे पथक, रोहा रेस्क्यू टीम आणि एस.व्ही.आर.एस.एस. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या पथकांनी संयुक्तपणे मोहीम राबवत ‘रोप रेस्क्यू ऑपरेशन’च्या मदतीने साहीदचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाकडून पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जास्वंदाच्या तेलाने थांबेल केस गळती आणि केसांना मिळेल पोषण; जाणून घ्या तेल बनवण्याची सोपी कृती
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली








