Share

Uddhav Thackeray: “हे काय गोट्या खेळायला एकत्र आलेत?”; ठाकरेंचा भाजपवर गंभीर वार!

“आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग तुम्ही काय गोट्या खेळायला आलात?” उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूर प्रकरणावरही त्यांनी गंभीर आरोप केले.

Published On: 

Uddhav Thackeray , Devendra Fadnavis. eknath shinde

🕒 1 min read

नाशिक: राजकारणात सत्तेसाठी कोण कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम उरलेला नाही. “तुम्ही सत्तेसाठी एकत्र आलात,” या विरोधकांच्या आरोपाला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अत्यंत आक्रमक शैलीत उत्तर दिलं आहे. नाशिकमधील भाषणात आणि मुलाखतीत त्यांनी महायुतीच्या कारभाराची अक्षरशः पिसे काढली. “आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग हे काय गोट्या खेळायला की विटी-दांडू खेळायला एकत्र आलेत?” असा रोकठोक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

बदलापूर अत्याचाराचा (Badlapur Case) उल्लेख करताना ठाकरेंचा संताप अनावर झाला. ते म्हणाले, “सत्तेसाठी तुम्ही विकृतीला स्वीकृती देताय.” बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे (Tushar Apte) याला भाजपने नगरसेवकपद दिलं, यावर त्यांनी बोट ठेवलं. “मुख्य आरोपी अक्षय शिंदे जिवंत असता तर तुषार आपटे आज तुरुंगात असता. म्हणूनच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर (Encounter) केलं का? या बातमीवरून तशीच पुष्टी मिळतेय,” असा खळबळजनक आरोप ठाकरेंनी केला. ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना मांडीवर घेणं हे सत्तेसाठी नाही तर कशासाठी आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मुंबईतील मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दाही ठाकरेंनी पुन्हा एकदा पेटवला. ते म्हणाले, “मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या मुंबईत घर नाकारलं जातं. अन्नावरून भेद केला जातो. जर माझ्याच घरात मला कुणी ‘आप गंदे हो’ असं सुनावत असेल, तर मी काय करायचं?” संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोरारजी देसाईंनी गोळ्या झाडल्या होत्या, याची आठवण करून देत, २०१४ नंतर भाजपने आमचा वापर करून फेकून दिलं, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

दोन मराठी भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र आले तर यांच्या पोटात का दुखतं? निवडणूक काय फक्त खुर्चीसाठी लढवायची असते का? असा सवाल करत ठाकरेंनी भाजपला आरसा दाखवला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)