🕒 1 min read
रोज सकाळी उठायचं आणि टीव्हीवर पाहायचं की आपले आमदार-खासदार आज नेमके कोणत्या पक्षात गेलेत… महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हाच खेळ सुरू आहे. रोजच्या या पक्षांतराच्या वावड्यांनी राजकीय वातावरण पुरतं ढवळून निघालं असतानाच, आता थेट खासदार सुप्रिया सुळे यांनीच यावर एका वाक्यात असा काही बॉम्ब टाकलाय की ऐकणाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.
नाशिकमधील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी पक्षांतराच्या अफवांवर मिश्किल पण अत्यंत खोचक शब्दांत नाराजी व्यक्त केली. ठाकरे गटापाठोपाठ आता शरद पवार गटाचेही काही नेते एकनाथ शिंदे यांच्या रडारवर असल्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत. याच चर्चांचा समाचार घेताना सुळेंनी मीडिया आणि राजकीय विरोधकांना चांगलाच चिमटा काढला.
Supriya Sule: ‘आता फक्त मनसेत जाणं बाकी राहिलंय…’
कार्यक्रमात बोलताना सुळे म्हणाल्या, “आमचा आठ खासदारांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. रोज आम्हाला टीव्हीवर कुठल्या ना कुठल्या नव्या पक्षात पाठवलं जातं. त्यावर आम्ही गमतीने एकमेकांना म्हणतो की आता फक्त मनसेमध्ये जायचं तेवढं बाकी राहिलंय.” आपल्या खासदारांना जणू बाजारातील वस्तू (कमोडिटी) करून ठेवल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. “हे अत्यंत दुर्दैवी असून आता राष्ट्रवादीचे खासदार इंटरनॅशनल करून टाका आणि आम्ही थेट ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करू,” अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
दुसरीकडे, पडद्यामागे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर-३’ ची जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार गळाला लागल्यानंतर, आता खुद्द शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही काही आमदार-खासदार शिंदे गटाच्या टार्गेटवर आहेत.
या नेत्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर येत आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न सुरू असून, ठाकरे गटाच्या आणखी ५ आमदारांचे मन वळवण्याची धडपड सुरू आहे. या ‘ऑपरेशन टायगर-३’ ची धुरा माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय निलेश देशमुख यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखी मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.
📌 महत्वाच्या बातम्या
- पार्थ पवार अडकणार विवाहबंधनात: ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण जिच्याशी पुण्यात होणार साखरपुडा?
- EPFO EDLI Scheme: नोकरदारांची चांदी! पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या फ्री विम्यासह आता १ लाखाचा वाढीव बोनस कसा मिळणार?
- सोलापूर हादरलं: लग्न होऊन अवघे दोन महिने, २६ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











