पुणे, 6 ऑक्टोबर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माघार घेतली आहे. या निर्णयावरून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे यांना तीन अपत्ये असल्याची बाब समोर आणल्यानेच त्यांनी माघार घेतल्याचा दावा पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सुरुवातीला मोठा गाजावाजा करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदे यांना तीन अपत्ये असल्याचा मुद्दा आम्ही उघड केला. त्यानंतर पदाची अप्रतिष्ठा होऊ नये, असा साक्षात्कार त्यांना झाला. चोरी पकडली गेल्यानंतर प्रामाणिकपणाचा आव आणण्याचा हा प्रकार असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, आधीच नियमांचा आदर केला असता तर ही नामुष्की ओढवली नसती, असेही ते म्हणाले.
यापूर्वी १ ऑक्टोबर रोजीही रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून शिंदे यांना घेरले होते. कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच तीन अपत्यांबाबतचे कायदे आणि नियम माहीत नसतील, तर काय बोलावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
दुसरीकडे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राम शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीने हा निर्णय घेतल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. ६ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून, ७ ते २१ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. २ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी संघातून वगळले; सिद्धेश लाडकडे नेतृत्व
- मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; हरदीपसिंग पुरींसह दोन मंत्र्यांची गच्छंती, श्रीकांत शिंदेंना संधी?
- शरद लाड यांचा अर्ज ‘डमी’, भाजपमध्ये बंडखोरी नसल्याचा रवींद्र चव्हाणांचा दावा
Quick Answers
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
राम शिंदे यांना तीन अपत्ये असल्याची बाब समोर आणल्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले. तसेच, कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीने हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









