प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत रोहित पवारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेली टीका आता खपवून घेतली जाणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच, काही जण राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘मफलरमॅन’ असा केला होता. यावेळी त्यांनी व्हीएसआर कंपनीचे रोहित सिंग आणि फडणवीस यांचा एकत्र फोटो समोर आणल्याने खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे फडणवीस यांचा हात आहे असे आपले म्हणणे नाही, पण विमान कंपनीचे मालक आणि फडणवीस यांचे चांगले संबंध असल्याने तपास यंत्रणांच्या माध्यमातून योग्य कारवाई होईल की नाही, याबाबत शंका येते, असे रोहित पवार म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी रोहित पवारांनी राज्याची आणि फडणवीस यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
रोहित पवारांना चिमटा काढताना बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य योग्य असल्याचे सांगितले. तसेच, रोहित पवारांनी शरद पवारांचे संस्कार पाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. रोहित पवार जे करू पाहत आहेत ते राज्याच्या हिताचे नाही, असे सांगत फडणवीस यांनी विकासाच्या राजकारणात पक्ष किंवा गटबाजी आणली नसल्याचे ते म्हणाले. यावेळी इशारा देताना बावनकुळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला जाऊ नका, त्याचे परिणाम वाईट होतील. ही धमकी नाही.”
याचवेळी मंत्री बावनकुळे यांनी शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्या गेल्याच्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. या घटनेत नेमके काय घडले, याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगत त्यांनी शायना एनसी यांची बाजू मांडली. त्या प्रगल्भ आणि हिंदुत्ववादी नेत्या असून त्यांचा तसा स्वभाव नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
या प्रकरणावर भाष्य करताना बावनकुळे यांनी म्हटले की, “अनावधानाने घडलं असेल. माझ्याकडूनही कधी कधी अनावधानाने घडतं. त्यांची गल्लत झाली असेल. आमच्या बहिणीच्या हातून काही झालं असेल तर त्याला माफ करता येतं.” या प्रकरणात शायना एनसी यांना सोडून दिले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- जमिनीच्या वादातून पुण्यात भयंकर घटना; हक्कसोड पत्रासाठी भाच्यानेच केली मामाची कोयत्याने वार करून हत्या
- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला मुंबईतून अटक
- सत्ताधारी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतायत; फायनान्सवाल्यांना पैसे नाहीत सांगा: मनोज जरांगे पाटील








