प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: अजितदादांच्या अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेत्यांकडून रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला जात असून, मंत्री नितेश राणे यांनी त्यांचा उल्लेख ‘तीनपाट’ आणि ‘पप्पू’ असा करत सडकून टीका केली आहे.
नितेश राणे यांनी रोहित पवारांना शरद पवारांच्या सामाजिक प्रवासाची आठवण करून दिली. राणे म्हणाले की, शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध व माणुसकी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जपली. मात्र, स्वतःला पवार म्हणवून घेणारा हा ‘तीनपाट’ व्यक्ती तोंड उघडून आधी मफलर दाखवतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नाव जोडतो.
महाराष्ट्राने याच्यासारखा मिठाला न जागणारा आणि कृतघ्न (नमक हराम) व्यक्ती पाहिला नसेल, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली. राणे म्हणाले की, ते रोहित पवार यांना आधी मित्र आणि अभ्यासू मानायचे, पण आता ‘पप्पू’ होण्यात त्यांनी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनाही मागे टाकले असून स्वतःच्या अकलेचे प्रदर्शन केले आहे.
दुसरीकडे, सदाभाऊ खोत यांनीही रोहित पवारांवर कडाडून हल्ला चढवला. संपूर्ण महाराष्ट्राला अजितदादांविषयी आदर आहे. पुण्यात त्यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम सुरू असताना रोहित पवारांनी केलेले विधान म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे खोत म्हणाले. खुर्चीसाठी रोहित पवार राजकारणाच्या पटलावर कपटनीती राबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
शेतात पेरणी केल्यावर कोणते पीक येईल हे समजते, पण इथे सहा महिन्यांत संशयाचे पीक बदलत आहे; त्याचे बीज काय आहे हे महाराष्ट्राला सांगावे, असे आव्हान खोत यांनी दिले. तसेच, ‘देवाभाऊ’ हे कलियुगातील अभिमन्यू असून ते तुमच्या चक्रव्यूहात कधीही फसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








