मुंबई, 5 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची घोषणा केली असून, या यादीतून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांना वगळण्यात आले आहे. बड्या मंत्र्यांची नावे यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
या दोन्ही नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर २०२६ रोजी संपत आहे. मात्र, नव्या यादीत नाव नसल्याने त्यांना पुढील सहा महिन्यांत पुन्हा राज्यसभेवर निवडून आणावे लागेल, अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा दिल्लीत सुरू आहे. हरदीपसिंग पुरी हे जानेवारी २०१८ आणि नोव्हेंबर २०२० मध्ये उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेले होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
हरदीपसिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांच्या संभाव्य गच्छंतीमुळे रिक्त होणाऱ्या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे १३ खासदार असल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. यामुळे केंद्रात शिवसेनेला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, या शर्यतीत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
दुसरीकडे, भाजपच्या ‘एक व्यक्ती-एक पद’ धोरणामुळे आणखी काही मंत्र्यांच्या पदावर टांगती तलवार आहे. उत्तर प्रदेश भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष पंकज चौधरी आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी काढली जाण्याची दाट शक्यता आहे.
पंजाबमधील रवनीतसिंग बिट्टू आणि केरळमधील जॉर्ज कुरियन यांच्याबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडी पाहता आगामी काळात पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात मोठे राजकीय फेरबदल घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद लाड यांचा अर्ज ‘डमी’, भाजपमध्ये बंडखोरी नसल्याचा रवींद्र चव्हाणांचा दावा
- भाव गडगडल्याने शेतकऱ्याने तीन एकर उभ्या कोबीवर फिरवला रोटावेटर
- निवडणूक आयोगाच्या कामकाजावर माजी न्यायमूर्ती नरीमन यांची गंभीर चिंता; ‘एसआयआर’ प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न








