पुणे शिक्षक निवडणूक : ‘कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटणार नाही’, मंगेश चिवटेंचा मोठा दावा

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला असून, भाजपचे कौस्तुभ गावडे माघार घेण्याची शक्यता मंगेश चिवटे यांनी वर्तवली आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 17 ऑक्टोबर: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना अधिकृत पत्र काढून पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडींनंतर शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. सानप यांच्या प्रचाराचा धडाका आणि शिंदेंचे वेगळे रूप पाहून पुढील दोन दिवसांत कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी मागे घेतली तरी आश्चर्य वाटायला नको, असा मिश्किल टोला चिवटे यांनी लगावला आहे.

या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुरुवातीला मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र शेवटच्या दिवशी त्यांनी तो मागे घेतला. आता ते स्वतः सचिन सानप यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये यासाठी त्यांनी 'मंगेश चिवटे म्हणजेच सचिन सानप' ही टॅगलाईन दिली असून, सानप यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारी मागे घेतल्याने आपण नाराज असल्याच्या चर्चा चिवटे यांनी सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना फेटाळून लावल्या. जर मी नाराज असतो तर सचिन भाऊंसाठी रात्रंदिवस एक केला नसता, आम्ही त्यांच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी करत आहोत, असे चिवटे म्हणाले.

भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी मंगेश चिवटे आपल्या संपर्कात असल्याचा आणि त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. यावर पलटवार करताना चिवटे म्हणाले की, गावडेच माझ्या संपर्कात असून त्यांचा आतून सचिन सानप यांनाच पाठिंबा आहे. याच संदर्भात त्यांनी गावडे यांच्या माघार घेण्याच्या शक्यतेवर भाष्य केले.

या राजकीय घडामोडींवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आपण गेली १६ वर्षे शिक्षक संघटनेत काम करत असून, एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांमधील अंडरकरंट ओळखला असल्याचे ते म्हणाले. येथे नाशिक पॅटर्न नव्हे तर शिक्षक पॅटर्न चालणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या पक्षांना साधा शिक्षक उमेदवार मिळाला नाही, अशी टीका करत त्यांनी शिंदे यांच्या एका शब्दावर चिवटे यांनी माघार घेतल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी शिंदेंनी आपल्याला पाठिंबा दिला असून, काही आमदार जे आगीचे बंब ओतत आहेत, ते विझवण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे सानप म्हणाले.

सध्या आपण शिक्षक व प्राध्यापक म्हणून निवडणूक लढवत असल्याने पक्षप्रवेशाची आवश्यकता नाही, मात्र शिवसेनेने मोठी ताकद उभी केल्याने गरज पडल्यास पक्षातही प्रवेश करू, असे सानप यांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर निवडणुकीबाबत पक्षाकडून अद्याप सूचना आलेल्या नाहीत. शिक्षकांचा आमदार शिक्षकच असायला हवा, बदल्यांच्या नावाखाली धमक्या देणारे संस्थाचालक चालणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीवर बोलताना सानप म्हणाले की, ६ तारखेला अर्ज भरण्याची मुदत संपली आणि ३ तारखेला गावडे ३० वर्षांचे झाले. आपल्याकडे ३० वर्षांचा अनुभव असलेले शिक्षक असताना एखाद्या उमेदवारात एवढी इमॅच्युरिटी असेल तर त्यांच्याबद्दल काय बोलावे, असा सवाल सानप यांनी उपस्थित केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही