प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाने पुन्हा एकदा भाजपकडे अर्थखाते देण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपकडून हे खाते कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार गटाला सतर्क केले आहे. त्यांनी भाजपवर या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीत सुनेत्रा पवार गटाचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीला अर्थखाते परत देण्याची मागणी केली. अजित पवार यांच्या निधनाला नऊ महिने उलटून गेल्यानंतर आता टिंगरे यांनी या खात्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडेच ठेवले होते. काही महिन्यांनंतर राष्ट्रवादीने हे खाते मिळवण्यासाठी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका घेऊनही तोडगा निघाला नव्हता. यावरून रोहित पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'अजितदादा गेल्यानंतर भाजपने हावरटासारखे अर्थखाते चोरून घेतले आणि अद्याप दिलेले नाही. ते आता देणारही नाहीत,' असा खोचक टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही राज्य सरकारला घेरले. सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरत नाही, तोपर्यंत त्यांना दिवाळी साजरी करू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यभरात आंदोलने उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही लोकांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करू आणि सरकार ऐकणार नसेल, तर त्यांना हे महाग पडेल, असे ते म्हणाले.
सरकारने दिलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरही रोहित पवारांनी आक्षेप नोंदवला. या तुटपुंज्या मदतीमुळे सरकार शेतकरी, शेतमजूर, महिला आणि छोटे व्यापारी यांना गृहीत धरत असल्याचे सिद्ध होते, असे ते म्हणाले. 'आमदार-खासदार फोडले म्हणजे कोणाची गरज लागत नाही, असा सरकारचा समज झाला आहे. मात्र, गरिबांना विसरलात तर ते तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवतील,' असा खणखणीत इशाराही रोहित पवारांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
- SA vs AUS 2nd Test: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीची ड्रीम 11 टीम आणि पिच रिपोर्ट
- बीसीसीआयच्या निवड समितीने यशस्वी जैस्वालचा आत्मविश्वास उद्ध्वस्त केला; आर. अश्विनचा गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






