प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरुवातीला विलीनीकरणाबाबत वक्तव्य केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता दोन्ही गटांकडून एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काकडे म्हणाले की, “काही काळापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही, अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. मात्र, आता त्यांनी ९० अंशाचा युटर्न घेतला आहे.”
“त्यांच्या मनात, ओठात आणि पोटात नेमकं काय आहे, हे मी सांगू शकत नाही,” असा टोलाही काकडे यांनी लगावला आहे. तसेच, अजित पवार गटाचे काही नेते शरद पवार यांच्या संपर्कात असून सिल्व्हर ओकवर त्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे आमदार दिवाळीच्या शुभेच्छा आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी साहेबांना भेटणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सुनील माने यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आता कायमचा बंद झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांनीही हा मुद्दा आमच्यासाठी संपल्याचे सांगितल्याची माहिती माने यांनी दिली.
दरम्यान, अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता सर्वच आमदारांनी वेळ मागितल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय शिजतंय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- २०२८ पासून आयपीएलमध्ये १२ संघांचा समावेशाची शक्यता, पुणे आणि वडोदरा फ्रँचायझी शर्यतीत आघाडीवर
- झिम्बाब्वेचा कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम, दोन्ही डावांत ५०० हून अधिक धावा करणारा पहिला संघ
- अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्स सोडणार? सहमालक पार्थ जिंदाल यांनी फेटाळल्या अफवा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







