प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: भारतीय रेल्वेने ग्राहकांसाठी पार्सल सेवा अधिक सोपी आणि आधुनिक बनवत ‘डोअर-टू-डोअर’ पार्सल सेवेची सुरुवात केली आहे. यासाठी नवीन रेल्वे पार्सल ॲप आणि वेबसाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आता ग्राहकांना पार्सल पाठवण्यासाठी रेल्वे स्थानकावर रांगेत उभे राहण्याची आवश्यकता उरणार नाही.
सुरुवातीच्या टप्प्यात ही अत्याधुनिक सुविधा मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू या देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरात तिचा विस्तार होईल. या डिजिटल सुविधेमुळे छोटे व्यापारी, शेतकरी, कारागीर आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील विक्रेत्यांना अत्यंत माफक दरात घरबसल्या पार्सल पाठवण्याचा लाभ घेता येणार आहे.
ही डोअर-टू-डोअर सेवा तीन टप्प्यांत काम करेल. पहिल्या टप्प्यात (फर्स्ट माईल) रेल्वेचे लॉजिस्टिक्स पार्टनर ग्राहकांच्या घरून किंवा कार्यालयातून पार्सल उचलतील. दुसऱ्या टप्प्यात (मिडल माईल) रेल्वेमार्फत हे पार्सल सुरक्षितपणे इच्छित स्थानकापर्यंत पोहोचवले जाईल. तर शेवटच्या टप्प्यात (लास्ट माईल) लॉजिस्टिक्स पार्टनर ते पार्सल थेट प्राप्तकर्त्याच्या पत्त्यावर नेऊन देतील.
ॲपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून पार्सलची माहिती भरू शकतील. तसेच, रेल्वे भाडे आणि पिकअप-डिलिव्हरी शुल्कासह संपूर्ण रक्कम युपीआय, कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे एकाच वेळी भरता येईल. या सुविधेमध्ये फिजिकल वे-बिलाची गरज भासणार नाही; त्याऐवजी डिजिटल फॉर्वर्डिंग नोट आणि ओटीपी आधारित प्रणाली वापरली जाईल. प्रत्येक पार्सलला १० अंकी विशेष ट्रॅकिंग नंबर दिला जाणार असून, त्यामुळे मोबाईलवरच पार्सलचे लाईव्ह लोकेशन आणि प्रत्येक टप्प्याची माहिती मिळेल. पार्सलची अंतिम डिलिव्हरीदेखील संपूर्णपणे ओटीपीच्या माध्यमातूनच होईल.
रेल्वेची गाडी सुटण्याच्या १५ दिवस आधीपासून ते किमान एक दिवस आधीपर्यंत पार्सलचे बुकिंग करता येणार आहे. पिकअप होण्यापूर्वी बुकिंग रद्द केल्यास नियमांनुसार ग्राहकांना परतावा (रिफंड) दिला जाईल. दरम्यान, ग्राहकांनी आपले सामान सुरक्षितपणे पॅक करावे, तसेच कोणत्याही ज्वलनशील, विस्फोटक किंवा प्रतिबंधित वस्तूंचे बुकिंग करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये अतिरिक्त आकारणार; रिकामी बाटली दिल्यास मिळणार परतावा
- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीनंतरची WTC गुणतालिका: वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून विजय
- ८७ धावांच्या पराभवानंतर भुवनेश्वर कुमारला वगळण्यावरून मोहम्मद कैफची भारतीय संघावर टीका
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








