Share

सीजेपीच्या आंदोलनावरून दिल्लीत धरपकड; ‘ही तर हुकूमशाही’ म्हणत अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

सीजेपीच्या आंदोलनावरून दिल्लीत सुरू असलेल्या धरपकडीवर अंबादास दानवे संतापले असून, त्यांनी भाजप सरकारवर हुकूमशाही आणि आणीबाणी लादल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Published On: 

Ambadas Danve abused the officers during DPDC meeting in Chhatrapati Sambhajinagar

प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा आणि एसआयआर (SIR) रद्द करण्यात यावा, या मागण्यांसाठी सीजेपीने (CJP) दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी आंदोलक आणि विरोधी नेत्यांची धरपकड सुरू केली असून, या कारवाईवरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात हुकूमशाही की आणीबाणी सुरू आहे, असा संतप्त सवाल विचारत दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आंदोलनासाठी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह इतर पदाधिकारी दिल्लीत गेले असता, पोलिसांनी त्यांना थेट विमानातूनच ताब्यात घेतले. दुसरीकडे, दिल्लीच्या रस्त्यांवर जेन-झी, विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बड्या नेत्यांना स्थानबद्ध केले असून, शहरात तब्बल ४० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

विमानात घुसून आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या पोलिसांच्या कृतीवर दानवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “पोलीस घरात किंवा एखाद्या कार्यालयात घुसल्याचे आपण समजू शकतो, पण थेट विमानात पोलीस घुसून कारवाई करत आहेत. आतापर्यंत कमांडोही विमानात घुसले नाहीत, यावरून सरकारने आंदोलनाचा किती मोठा धसका घेतला आहे हे स्पष्ट होते,” असे दानवे म्हणाले. जंतर-मंतर बंद करणे आणि आंदोलकांना रोखणे हा लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

“चेंडू जेवढा दाबाल तेवढा तो उसळतो. ही भूमी धडाविना लढणाऱ्या बाजीची आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याला तुरुंगात टाकल्याने आंदोलन थांबणार नाही, उलट ते अधिक ताकतीने पेटेल,” असा थेट इशारा दानवे यांनी दिला. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून, येथे आंदोलने दडपण्याचे परिणाम भाजपला भोगावेच लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत सार्वजनिक वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो बंद करण्याच्या निर्णयावरही दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वच जण आंदोलनासाठी येत नाहीत, तर अनेक सामान्य नागरिक नोकरीसाठी किंवा विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोचा वापर करतात. त्यामुळे न्यायालयाने यात लक्ष घालून तातडीने रेल्वे आणि मेट्रो सेवा पूर्ववत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. आपली दडपशाही दिसू नये यासाठी सरकारने इंटरनेट सेवाही बंद केली असून, हे वागणे योग्य नसल्याचे दानवे यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही