प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरून अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना तिने राहुल गांधींची तुलना थेट ‘नापास झालेल्या विद्यार्थ्याशी’ केली असून, देशातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले आहे.
राहुल गांधींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन केलेल्या तक्रारीवर कंगनाने खोचक प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “राहुल गांधींना राष्ट्रपतींना भेटून आक्षेपार्ह बाबींची तक्रार करण्याचा अधिकार आहे. मात्र, नापास झालेल्या मुलांना नेहमी वाटायचे की, पास झालेल्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका वेगळी होती किंवा शिक्षकांचा त्यांच्यावर काहीतरी राग होता. सध्या निवडणुकांपासून ते एबीव्हीपीपर्यंत सर्वत्र भाजपचाच विजय होत आहे. त्यामुळे आता कोल्ह्याला द्राक्षे आंबट, अशी त्यांची अवस्था झाली असून संपूर्ण देश त्यांच्यावर हसत आहे.”
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत बोलताना कंगनाने संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “गद्दार, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने ही सध्या आपल्या देशासमोरील अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. कारण काहीही असो, देश आणि येथील नागरिक कोणत्या ना कोणत्या समस्येशी झगडत आहेत. पण प्रभू राम आणि हनुमानाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींसमोर सर्व भारतीय एकमेकांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहेत. अनेक जण या देशद्रोही शक्तींचा बुरखा फाडण्यात गुंतले आहेत. मला तर वाटते की पोलिसांचा विचार सोडून द्या, संतप्त झालेली जनताच आता त्यांना पकडून चोप देईल.”
दरम्यान, सीजेपी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी मतदार यादीतील विशेष सखोल पुनरावलोकनातील (SIR) अनियमिततेविरोधात हे आंदोलन पुकारले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न होत असून त्यांना ताब्यात घेतले जात आहे. सरन्यायाधीशांनी ७ ऑक्टोबर रोजी पोलिसांना या आंदोलनाची माहिती दिली होती. मात्र मागील आंदोलनांच्या वेळी अटींचे पालन न झाल्याने याला परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंचनाम्यांचे नाटक थांबवून शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात
- तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने तणाव वाढला; आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
- जागतिक मानसिक आरोग्य दिन: सतत थकवा आणि कामात लक्ष लागत नाहीये? ‘वर्कप्लेस बर्नआउट’ची ही ५ लक्षणे वेळीच ओळखा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









