तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) FDA (FDA Maharashtra) आयुक्त झाल्यापासून कारवायांचा धडाका सुरू आहे, पण सर्वसामान्यांचे हॉटेल सील करणारे अधिकारी मंत्रालयातील कँटीनकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक करतात का? याच दुटप्पी भूमिकेवरून आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एफडीएच्या अधिकाऱ्यांना भर कोर्टात चांगलंच झापलं आहे.
नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलला एफडीएने अगदी छोट्याशा कारणावरून थेट टाळं ठोकलं होतं. या कारवाईविरोधात हॉटेल प्रशासनाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर, कोर्टाने थेट मंत्रालयाच्या कँटीनची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आणि त्यातून अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं.
Bombay High Court on FDA
सुनावणीदरम्यान सुरुवातीला एफडीएने न्यायालयात दावा केला होता की मंत्रालयातील उपहारगृह तब्बल ९८ टक्के स्वच्छ आहे. मात्र, न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलांनी केलेल्या तपासणीत अवघ्या अर्ध्या तासात तिथे माश्या, उघड्या गटारांच्या जाळ्या आणि अत्यंत अस्वच्छ फ्रीज आढळून आला.
“एका केळ्यावर काळा डाग दिसला म्हणून तुम्ही थेट हॉटेल सील करता. पण दुसरीकडे मंत्रालयात उघड्या ड्रेनेजजवळ भांडी घासली जातात, तिथे घाणेरडं पाणी साचलंय, तरीही ते तुम्हाला कसं दिसलं नाही?” असा संतप्त सवाल न्यायाधीशांनी विचारला. मंत्रालयातील फ्रीजचे फोटो पाहून कोर्टाने थेट सुनावलं की, यापेक्षा तर चपलांचा स्टँड स्वच्छ असतो.
न्यायालयाने एफडीएला खडेबोल सुनावत स्पष्ट केलं की, तुम्ही अशी दुटप्पी कारवाई करू शकत नाही. थेट परवाने रद्द करत सुटलात, तर मुंबईतील निम्मी आस्थापने बंद पडतील. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही आणि व्हीव्हीआयपी तर अजिबात नाही, हे लक्षात ठेवा.
एकतर मंत्रालयाच्या कँटीनचा परवाना रद्द करा, किंवा त्या पंचतारांकित हॉटेलचा परवाना पुन्हा बहाल करा, असे थेट निर्देशच उच्च न्यायालयाने दिले. कोर्टात खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला.
अखेर या कडक सुनावणीनंतर एफडीएने नमती भूमिका घेतली. त्यांनी संबंधित हॉटेलचा परवाना रद्द करण्याची कारवाई मागे घेत, त्यांना केवळ सुधारणा नोटीस (Improvement Notice) देण्याचं मान्य केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मंत्रालयाच्या कँटीनलाही अशीच नोटीस बजावली जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार; पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!
- ‘…तर सरकार पाडण्याचा कट होता’; मोदींबद्दलच्या आक्षेपार्ह घोषणांवर मुकेश खन्ना संतप्त
- मुकेश खन्नांचा CJP आंदोलकांवर संताप; जेन झिंना खडसावत म्हणाले, ‘घाणेरड्या गटारातील किडे…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












