Share

…अन्यथा अमित शहांच्या पुणे भेटीला विरोध करणार; काँग्रेसचा भाजपला इशारा

अमित शाह यांच्या १ ऑगस्टच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध असून, भाजपनेही जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Published On: 

Amit Shah

पुणे : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि ‘पेलेट गन्स’चा (pellet guns) वापर या मुद्द्यांमुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संसदेत या विषयावरून आधीच खडाजंगी सुरू असताना, आता पुण्यातही राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी यावर उत्तरे द्यावीत, अन्यथा त्यांच्या पुणे दौऱ्याला विरोध केला जाईल, असा इशारा राज्य काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १ ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहेत. या दौऱ्याला काँग्रेस पक्ष विरोध करणार असल्याचे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जंतरमंतर येथील जखमी विद्यार्थ्यांना प्रसार माध्यमांसमोर आणले होते.

दिल्ली पोलीस आणि आरएएफ (RAF) जवानांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे देशभरातील पालकांमध्ये तीव्र संताप आहे. देशातील शिक्षण पद्धती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणांची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी होती. त्याऐवजी, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर क्रूर हिंसाचार केला. केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी या मुद्द्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत आणि ते जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, असे जोशी यांनी ठामपणे सांगितले.

मोहन जोशी यांच्या या इशाऱ्यामुळे पुण्यात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दौऱ्यादरम्यान तीव्र आंदोलन करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, गृहमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसला ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

पुरस्कार सोहळ्यावरून राजकीय संघर्ष

१ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यासाठी पुण्यात येत आहेत. काँग्रेस पक्ष या महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठित कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

घाटे यांची कठोर टीका

पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर निशाणा साधत घाटे म्हणाले, “काँग्रेसचे शहर अध्यक्ष केवळ पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचे राजकारण करत आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणे, हे काँग्रेस पक्षाच्या संस्कृतीला शोभणारे नाही. जर काँग्रेसने कायदा हातात घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील.”

याव्यतिरिक्त, भाजपच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना एक अधिकृत पत्र सादर करण्यात आले आहे. यात काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देऊ नये, जेणेकरून हा कार्यक्रम कोणत्याही गोंधळाशिवाय शांततेत पार पडेल, अशी विनंती करण्यात आली आहे. घाटे यांनी इशारा दिला की, जर पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिली, तर रस्त्यावर उतरून प्रति-आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार भाजपला असेल. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी पोलीस प्रशासनाला केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही