प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या क्लिपमुळे महायुतीच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपमधून एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा कोणी उचलला आहे? असा खळबळजनक सवाल केला होता. कदमांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीतील या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपला शिंदेंची भीती वाटू लागली आहे का? या प्रश्नावर थेट उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘आम्हाला एकनाथ शिंदेंची भीती कशाला वाटेल? शिंदे आमचे मित्र आहेत आणि ते पुढेही राहतील.’ तसेच फडणवीसांना संपवण्याची सुपारी कोणी घेतली होती, या प्रश्नावर बोलताना त्यांनी राजकारणातील परिपक्वता वाढणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘जनतेचा आशीर्वाद हा पद असणे किंवा नसण्याशी निगडित नसून, तो थेट केलेल्या कामाशी जोडलेला असतो,’ असे मुनगंटीवार म्हणाले.
ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या वादावरही मुनगंटीवार यांनी स्पष्ट मत मांडले. महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर अशी विधाने करू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला. या क्लिपकडे कुणीही लक्ष देऊ नये, हा राजकारणातील एखाद्या डावपेचाचा भाग असू शकतो, असे ते म्हणाले. ‘कॉमनसेन्स नावाचा एक शब्द असतो. कोणी असं ५०० कोटी रुपये देईल का? जरांगे हे सच्चे कार्यकर्ते आहेत, ते कशाला ५०० कोटी घेतील,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ‘आधी मनोज जरांगेंना मोठं केलं आणि आता त्यांना बाजूला का करत आहात?’ असा सवाल खैरे यांनी विचारला आहे. जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी व्हावी आणि क्लिपमध्ये उप-मुख्यमंत्र्यांचे नाव असल्याने सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच ५०० कोटींच्या कथित व्यवहाराची आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच हे आरोप केले जात असल्याचा संशयही खैरे यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता; रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार
- रामदास कदम आक्रमक नेते, प्रसाद लाडांनी त्यांच्या वयाचा आदर राखावा; ऑडिओ क्लिप वादावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
- भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








