मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीला आदित्य ठाकरे यांनी वकिलामार्फत उत्तर दिले आहे. सतीश सालियन यांचे सर्व आरोप फेटाळून लावत, आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी ही नोटीस पाठवल्याचा दावा ठाकरेंनी केला आहे. दुसरीकडे, या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल झाले असून, सतीश सालियन त्यांना एक महत्त्वाचा पेनड्राईव्ह देणार आहेत.
‘मातोश्री’वर येऊन दिलेल्या नोटिशीला उत्तर देताना, १६ सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव कुठेही नसल्याचे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. पोस्टमधील कोणतेही विशिष्ट वाक्य त्यांच्याकडे निर्देश करत नसून, राजकीय आणि माध्यमांच्या मोहिमेमुळे त्यांचे नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. सतीश सालियन यांची बदनामी करण्याचा आपला हेतू नसून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, आपण दिशा सालियनला ओळखत नसल्याचा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.
दरम्यान, दिशा प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून सुरू आहे. सतीश सालियन सीबीआय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जो पेनड्राईव्ह देणार आहेत, त्यात एका प्रत्यक्षदर्शीचा व्हिडीओ जबाब असल्याचा दावा करण्यात आला आहे. घटनास्थळी आदित्य ठाकरे आणि इतर व्यक्ती उपस्थित असल्याचा दावा या जबाबात असल्याची माहिती आहे.
या पेनड्राईव्हच्या माध्यमातून इतर प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाची माहिती असलेल्या व्यक्तींचा तपशीलही सीबीआयला दिला जाणार आहे. तसेच, परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवून त्यांच्या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणीही सतीश सालियन यांच्याकडून केली जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सर्व निर्णय सर्वसंमतीनेच, मतभेद स्वाभाविक’; अंतर्गत आक्षेपांच्या वृत्तानंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
- मुरुम माफियांना दणका! पोलिसांसमोरून हायवा पळवणारा चालक अखेर अटकेत; स्विफ्ट कार आणि जेसीबी जप्त
- “मी त्यांचं तोंडही पाहत नाही”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एकत्र प्रवास केल्यानंतर ओमराजेंचा पाटलांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











