हैदराबाद, 14 नोव्हेंबर: अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या कारणावरून तेलंगणा सरकारच्या ‘TG SAFE’ या विशेष अन्न सुरक्षा विभागाने हैदराबादमधील KFC आणि डोमिनोज (Dominos) च्या अनेक आऊटलेट्सचे FSSAI परवाने निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान या ठिकाणी स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे उघडकीस आल्याने ही धडक कारवाई करण्यात आली.
या आऊटलेट्सची तपासणी केली असता तेथे झुरळांचा वावर आणि उंदरांची विष्ठा आढळून आली. याशिवाय, मुदत संपलेले अन्नपदार्थ, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि खाद्यतेल स्वच्छ करण्यासाठी रसायनांचा बेकायदेशीर वापर होत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या कारवाईत जेवण बनवताना वापरण्यास मनाई असलेल्या ५२ किलो ‘सिंथेटिक मॅग्नेशियम सिलिकेट’ या रसायनाची जप्ती करण्यात आली असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी अन्नपदार्थांचे अनेक नमुनेही घेण्यात आले आहेत.
ज्या KFC शाखांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यामध्ये मियापूर, चारमिनार, बंजारा हिल्स, सिंधी कॉलनी, मूसा रामबाग, शिल्पा कला वेदिका आणि इनऑर्बिट मॉल येथील आऊटलेट्सचा समावेश आहे. तसेच, सरथ सिटी मॉल आणि इनऑर्बिट मॉलमधील डोमिनोजच्या शाखांवरही निलंबनाची कारवाई झाली आहे. या सर्व प्रमुख शाखांना तातडीने काम बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कारवाईचा फास ‘बिरयानी बाय किलो’, ‘कुलचा कल्चर’ आणि ‘ITC आशीर्वाद सोल क्रिएशन्स’ यांसारख्या इतर प्रमुख रेस्टॉरंट्सनाही बसला असून त्यांचे परवानेही निलंबित केले आहेत. जोपर्यंत या आस्थापनांचे परवाने पुन्हा बहाल केले जात नाहीत, तोपर्यंत त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याच्या सूचना स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि अन्न सुरक्षा मानकांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी तेलंगणा सरकारने उचललेले हे पाऊल आहे. संबंधित आस्थापनांना सुधारणा आणि कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार असून त्यानंतर दंडासारखी पुढील कारवाई केली जाईल. कॉर्पोरेट नफ्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळता येणार नाही आणि ब्रँड कितीही मोठा असला तरी नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








