मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच काही बोलू शकतो; शिंदेसेनेच्या मंत्र्याचा सुनील तटकरेंना सूचक इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत व राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.

Published On: 

Sunil Tatkare speaking to media about NCP merger claim

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत व राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. “मीही राष्ट्रवादीत काम केले आहे. या पक्षाबद्दल मीही बरंच काही बोलू शकतो, पण मला बोलायचे नाही,” असा सूचक इशारा मंत्री उदय सामंत यांनी सुनील तटकरे यांना दिला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी आपली आधीची भूमिका बदलत नुकताच एक दावा केला होता. ‘अजित पवार असते तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते,’ असे ते म्हणाले होते. यावर उदय सामंत यांनी टीका करताना, दोन महिन्यांपूर्वी विलीनीकरण होणार नाही असे सांगणारे तटकरे आता १२ फेब्रुवारीला विलीनीकरण होणार असल्याचे सांगत आहेत, त्यांच्या या भूमिकेमुळे मी आणि संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमात असल्याचे म्हटले होते.

सामंत यांच्या या टीकेनंतर सुनील तटकरे यांनीही पलटवार केला होता. उदय सामंत हे माझे एकेकाळचे सहकारी असून त्यांना मंत्री करण्यात आमचाही थोडा वाटा होता. आमचा पक्ष वेगळा असून त्यांना आमच्या पक्षाबद्दल बोलण्याची काहीही गरज नाही, असे तटकरे म्हणाले होते. त्याला आता उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्याला काय बोलावे याचे व्यक्तिस्वातंत्र्य असून, आपण केवळ पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत होतो. त्यामुळे तटकरे यांनी चिडण्याचे काहीच कारण नव्हते, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

‘मला कोणीही मोठे केलेले नाही. मला पहिल्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे तिकीट दिले. अजित पवार पाठीशी ठामपणे उभे राहिले, म्हणूनच मी आमदार होऊन राजकारणात आलो,’ असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच, साल २०२४ ला आपण राष्ट्रवादी सोडली असून, आपल्या पहिल्या तिकीटाचे अनेक पैलू असून त्या सर्व गोष्टी आपण जपून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रभर फिरताना राष्ट्रवादीबाबतचा जो संभ्रम जनतेच्या मनात आहे, तो जनताच आम्हाला सांगते. दोन्ही राष्ट्रवादींपैकी कोण कोणात विलीन होणार हा त्यांचा प्रश्न असून, पत्रकारांनी विचारल्यावर मी केवळ हा संभ्रम दूर करावा असे म्हटल्याचे सामंत यांनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी बोलताना उदय सामंत यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्र येण्यावरही भाष्य केले. दोन्ही शिवसेना एकत्र येणे शक्य नसून हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे काम करत असून आम्हाला दुसरीकडे जाण्याची कोणतीही गरज नाही, असेही मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही