शिरपूर, 14 नोव्हेंबर: धुळे जिल्ह्याच्या शिरपूर शहरात एका २५ वर्षीय तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत प्रवेश न मिळाल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली एक भावनिक चिठ्ठी सापडली असून, त्यात त्याने कुटुंबाविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.
डॉ. आयुष चंद्रकांत पवार असे जीवन संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या आयुषने एमबीबीएसच्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर त्याने मुंबईतील नामांकित केईएम (KEM) रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. आयुषचे वडील चंद्रकांत मुलचंद पवार हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आहेत, तर आई मनीषा एकनाथ पाटील या आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आयुष हा त्यांचा लहान मुलगा होता.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आयुषला १३०० रँक मिळाली होती. मात्र, पहिल्या फेरीत प्रवेश न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून तो निराशेच्या गर्तेत होता. ११ नोव्हेंबरच्या रात्री तो शिरपूर शहरातील विद्या विहार कॉलनीतील आपल्या राहत्या घरी पहिल्या मजल्यावर भावासोबत झोपला होता. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
आयुषने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकूर अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका. माझे कुटुंबीय आणि मित्रांचा मी आभारी आहे. मी माझ्या जीवनात अयशस्वी झालोय. आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा.” असे लिहून त्याने शेवटी आपली सही केली आहे. एका गुणी आणि होतकरू विद्यार्थ्याने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने शिरपूर शहरासह वैद्यकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जास्वंदाच्या तेलाने थांबेल केस गळती आणि केसांना मिळेल पोषण; जाणून घ्या तेल बनवण्याची सोपी कृती
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली








