प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चोर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जे कोणी आंदोलन करतील, त्या सर्वांना आपला भक्कम पाठिंबा राहील, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. आगामी होळीच्या सणापर्यंत राज्यातील महायुतीचे सरकार होळीप्रमाणेच जळून नष्ट झालेले पाहायला मिळेल, असा घणाघात त्यांनी केला. सत्तेत बसलेले पक्ष एकमेकांशी प्रचंड भांडत असून त्यांच्या तक्रारी हायकमांडपर्यंत पोहोचत आहेत. या अंतर्गत वादात फायली अडकून पडल्या असून जनतेची कामे पूर्णपणे रखडली आहेत. केवळ भांडणे सुरू असल्याने महाराष्ट्रातील जनतेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याची टीका त्यांनी केली.
राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर सडकून टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. एकीकडे पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिल्याचे सांगून त्याला ऐतिहासिक निर्णय म्हटले जात आहे, तर दुसरीकडे नमो शेतकरी सन्मान निधीचे ३ हजार ७०० कोटी रुपयांचे दोन हप्ते थकवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून उर्वरित १० तालुक्यांना अद्याप दुष्काळात समाविष्ट केलेले नाही. कर्नाटकात कमी दुष्काळ असूनही तेथील सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, मात्र महाराष्ट्र सरकार आखडत्या हाताने मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत न दिल्यास शेतकरी मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे कठीण करतील, असा इशाराही त्यांनी दिला. पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी होणार, गोडधोड सोडा पण साधे जेवण तरी होईल का, असा संतप्त सवाल करत सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असे ते म्हणाले.
पशुधन योजना सुरू होण्यापूर्वीच बीड जिल्ह्यात ८०० कोटी रुपयांचे बोगस प्रस्ताव तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार वडेट्टीवारांनी उघड केला. आरोप झाल्यानंतर हे प्रस्ताव रद्द करावे लागले. वैदेही ॲग्रो कंपनीच्या संचालकांनी सरकारमधील काही लोकांच्या संगनमताने हा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केला होता, जो वेळीच लक्षात आला. दुष्काळात असे काही लांडगे फायदे उचलायला टपून बसले आहेत. राज्यात ३७ टक्के कमी पाऊस झाल्याने केंद्राने महाराष्ट्राला योग्य मदत दिली पाहिजे. गुजरातला न मागता मदत मिळते, मात्र महाराष्ट्रात केंद्रीय पथके येऊनही दिवाळी तोंडावर असताना मदत मिळालेली नाही. दुष्काळात पीक विमा कंपन्या हात वर करून थातूरमातूर मदत देत पळ काढण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कुणाल कामरा यांच्या उमर खालिद संदर्भातील वक्तव्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खालिदला अडीच वर्षे तुरुंगात डांबून ठेवले आहे, मात्र अद्याप त्याच्यावर कोणतीही चार्जशीट दाखल केली नाही की पुरावे सादर केले गेले नाहीत. तो केवळ अल्पसंख्याक समाजाचा असल्यामुळेच त्याला डांबून ठेवले आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. कोर्टाने आदेश देऊनही पोलीस पुरावे सादर करत नाहीत. तसेच, दिल्लीत सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी पोलीस मुलींना मारहाण करतात, ही कसली पोलिसिंग आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांनी महाविकास आघाडीच्या भांडणांऐवजी महायुतीच्या वादाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला देत वडेट्टीवार यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. मनुस्मृतीने आंधळा झालेला पोंक्षे हा अर्धा शहाणा माणूस असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. पोंक्षे अनेकदा गोडसेचे नाव घेतात, पण स्वतःच्या मुलाचे नाव त्यांच्या नावावर ठेवतील का, असा सवाल त्यांनी केला. मनुस्मृतीला पहिले संविधान म्हणणाऱ्या पोंक्षे यांनी मनुस्मृतीत महिला आणि शूद्रांचे स्थान कुठे आहे, हे वाचून सांगावे. मनुस्मृतीने शूद्रांना कधीही बरोबरीचा अधिकार दिलेला नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- CAN vs NEP Dream11 Prediction: कॅनडा विरुद्ध नेपाळ सामन्याची ड्रीम ११ टीम, खेळपट्टी आणि संभाव्य प्लेइंग ११
- सूर्यकुमार यादवने दुबईत खरेदी केली आलिशान प्रॉपर्टी; शाहरूख खानच्या नावाने ठरले सर्वात मोठे आकर्षण
- सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी अभिजीत दिपकेंच्या घरी दिल्ली पोलीस, अटकेची शक्यता
Quick Answers
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मते, आगामी होळीच्या सणापर्यंत राज्यातील महायुतीचे सरकार होळीप्रमाणेच जळून नष्ट झालेले पाहायला मिळेल.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत न दिल्यास शेतकरी मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे कठीण करतील, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
पशुधन योजना सुरू होण्यापूर्वीच बीड जिल्ह्यात ८०० कोटी रुपयांचे बोगस प्रस्ताव तयार झाल्याचा प्रकार त्यांनी उघड केला. आरोप झाल्यानंतर हे प्रस्ताव रद्द करावे लागले.
वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, खालिदला अडीच वर्षे तुरुंगात डांबून ठेवले आहे, मात्र कोर्टाने आदेश देऊनही त्याच्यावर कोणतीही चार्जशीट दाखल केलेली नाही किंवा पुरावे सादर केलेले नाहीत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








