प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्यात आजपासून (१५ ऑक्टोबर) अधिकृतपणे ऊस गळीत हंगामाला सुरुवात होत असतानाच शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. उसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता आंदोलनाची दिशा बदलली असून कारखाने बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. याचाच एक भाग म्हणून आज रेठरे (कराड) येथील कृष्णा साखर कारखान्यावर 'काटा बंद' आंदोलन केले जाणार आहे.
मागील दोन दिवसांपासून कोगनोळी टोल नाक्यावर सुरू असलेले महामार्ग रोको आंदोलन सलग ३१ तासांनंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मागे घेण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावरच जेवण करत ठिय्या दिला होता, ज्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या शेकडो किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. आता हा लढा थेट केंद्रीय मंत्र्यांच्या दारात नेला जाणार असून, कर्नाटक राज्य रयत संघाचे प्रमुख चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वात बेळगावातील हत्तरकी टोल नाक्यावरून केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानावर पदयात्रा काढण्यात आली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील कारखानदारांविरोधातही राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) चौकशीला घाबरून सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी दराचा निर्णय न घेताच घाईघाईत कारखाने सुरू केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. या कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी सर्व साखर कारखाने 'काटा बंद' करून ऊसतोड रोखली जाईल, आणि दोन दिवसांनंतर कार्यकर्ते हुबळीतील पदयात्रेत सामील होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
बाजारात साखरेचे दर वाढत असल्याने उसाला ५५०० रुपये प्रतिटन देण्याची मागणी योग्य असल्याचे राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत म्हटले होते. तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक एफआरपी देणारे राज्य असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सरकारने २०२४-२५ सालासाठी मूळ उताऱ्याला ३४०० रुपये (३४० रुपये प्रतिक्विंटल) एफआरपी दिली होती, तर २०२५-२६ साठी ती ३५५० रुपये (३५५ रुपये प्रतिक्विंटल) केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात उसाचा उतारा ११ ते १२ टक्क्यांपर्यंत असल्याने हा दर आणखी वाढतो. मात्र, कारखानदार यातून ऊस तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वजा करत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती फारसे पैसे उरत नाहीत, म्हणूनच शेट्टी यांनी ५५०० रुपयांच्या दराची ठाम भूमिका घेतली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अंकिता भंडारी प्रकरण तापलं! सिक्कीमच्या राज्यपालांवर गंभीर आरोप, ‘VIP’चा ऑडिओ व्हायरल
- अस्वच्छता आणि खराब अन्नावरून FDA ची मुंबईत धडक कारवाई; १७ हॉटेल्ससह डॉमिनोजला दणका
- गोव्याला जाण्यापूर्वी नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती ‘ती’ शेवटची इच्छा; सच्चा दोस्त गमावल्याने मकरंद अनासपुरे भावूक
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








