मुंबई, 11 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या सीजेपी, शिवसेना (ठाकरे गट), मनसेच्या कार्यकर्त्यांसह तब्बल ३०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आता मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले होते. आता या कारवाईत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावरही गुन्हे दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीनेही तीन दिवस आंदोलन केले होते. याच पार्श्वभूमीवर रविवारी सीजेपीने शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, याला पोलिसांची परवानगी नसल्याने सकाळपासूनच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून कसून चौकशी सुरू होती. यावेळी आंदोलनासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात करताच तणाव निर्माण झाला. मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात असताना अमित ठाकरे यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना जाब विचारला. तसेच त्यांनी मनसैनिकांसह शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. दुसरीकडे, युवा सेनेकडूनही सीजेपीला पाठिंबा दिला जाणार होता. मात्र, पोलिसांनी थेट शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केल्याने मोठा राडा झाला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांच्या सुटकेसाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांची गाडी अडवली. कार्यकर्त्यांना सोडल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरे स्वतः पोलिसांच्या गाडीवर चढले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी पोलिसांशी चर्चा केली. अखेर या चर्चेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका केली.








