Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर निवडणूक आयोगातील इतर दोन सदस्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी थेट कॅबिनेट सचिवांकडे ज्ञानेश कुमार यांच्या एकतर्फी निर्णयांबाबत तक्रार केल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. या वृत्तानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधकांनी आयोगावर जोरदार टीका केली आहे.
गेल्या दहा महिन्यांत संधू आणि जोशी यांनी आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर किमान १४ वेळा प्रतिकूल मत नोंदवल्याचे या वृत्तात म्हटले आहे. नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी असलेल्या अर्ज क्रमांक ६ चे बदललेले स्वरूप, मतदार यादीतून नावे वगळणे किंवा समाविष्ट करणे, विशेष सखोल मतदार पडताळणी (एसआयआर) प्रक्रिया आणि मतदार याद्यांचे नवी दिल्लीत होत असलेले केंद्रीकरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्य आयुक्तांनी इतर सदस्यांचे मत डावलून निर्णय घेतल्याचा आरोप आहे.
या वृत्तानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्ञानेश कुमार हे हुकूमशहाप्रमाणे वागत असून ते पंतप्रधान मोदींना खूश करण्यासाठी इतर दोन आयुक्तांना महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की, “या वृत्तातील बाबी खऱ्या मानल्या तर निवडणूक आयोगाचा कारभार अदृश्य हातांद्वारे चालवला जात असल्याचे स्पष्ट होते. जर बहुमताला डावलून मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात असतील, तर हे महाभियोगासाठी योग्य प्रकरण आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “संधू आणि जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि गृह मंत्रालयाचा बुरखा फाडला आहे. त्यांची गृह खात्याकडे केलेली तक्रार दाबली गेली होती,” असा आरोप करत राऊत यांनी कुमार यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- रशियन तेलावरून भारताला शिक्षा देऊ नका; ट्रम्प यांच्या नव्या निर्बंधांनंतर जेपी मॉर्गनच्या सीईओंचा अमेरिकेला सल्ला
- थरार: मुरुम माफियांनी मुरुम खाली ओतला अन् पोलिसांसमोरून पळवला हायवा, चौघांवर गुन्हे दाखल
- शिवसेना कोणाची? सुनावणी पुढे ढकलली; मात्र सामंत, राठोड अन् भुसेंच्या सह्यांमुळे कोर्टात शिंदे गटाची कोंडी होणार: असीम सरोदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











